Congress On Exit Poll Result : एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक आघाडीचे नेतेही उपस्थित होते. य़ा बैठकीत काँग्रेसने महत्वपूर्ण निर्णय घेत एक्झिट पोलबाबत आपला निर्णय बदलला आहे.
आज लोकसभेसाठी (lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता काही वेळातच विविध संस्थांकडून घेतल्या गेलेल्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर होणार आहेत. या एक्झिट पोल्सबाबतच्या माध्यमांच्या चर्चेत सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय काँग्रेसकडून घेतला होता. आता इंडिया आघाडीची नवी दिल्ली येथे बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर काँग्रेसने आपला आधीचा निर्णय बदलला असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांचे प्रवक्ते एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी दिली आहे.
दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होऊन भाजपचा भांडाफोड करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एक्झिट पोलबाबतच्या चर्चेत सहभागी होण्याचे फायदे आणि तोटे यांचा सर्व बाजुंनी विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पवन खेरा यांनी दिली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्हाला देशभरातील मतदारसंघातून मिळालेल्या रिपोर्टनुसार इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा मिळतील. याहून कमी जागा होणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनीही इंडिया आघाडीला २९५ जागा मिळणार असल्याचे म्हटले.
इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह, तेजस्वी यादव, अखिलेश यादव व इतर नेते उपस्थित होते. मात्र पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्याचप्रमाणे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते.
संबंधित बातम्या