sangli lok sabha : सांगली लोकसभेची जागा लढण्यावर काँग्रेस ठाम, उद्धव ठाकरे आता काय करणार?-congress firm on contesting sangli lok sabha seat what uddhav thackeray will do now ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sangli lok sabha : सांगली लोकसभेची जागा लढण्यावर काँग्रेस ठाम, उद्धव ठाकरे आता काय करणार?

sangli lok sabha : सांगली लोकसभेची जागा लढण्यावर काँग्रेस ठाम, उद्धव ठाकरे आता काय करणार?

Mar 27, 2024 06:33 PM IST

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यापुढं आता मोठा पेच निर्माण झाला आहे.

सांगली लढण्यावर काँग्रेस ठाम, उद्धव ठाकरे आता काय करणार?
सांगली लढण्यावर काँग्रेस ठाम, उद्धव ठाकरे आता काय करणार?

Vishal Patil Reaction on Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत पडलेली ठिणगी आगीचं स्वरूप घेण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर उमेदवार घोषित केल्यानंतरही काँग्रेसचे स्थानिक नेते ही जागा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे व काँग्रेस हायकमांड आता काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli lok Sabha Constituency) हा सुरुवातीपासूनच कळीचा ठरला आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडं गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर दावा ठोकला होता. वेळोवेळी तसं अधोरेखितही करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर आज अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं संघर्षाची ठिणगी पडली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले विशाल पाटील (Vishal Patil) इथून लढण्यावर ठाम आहेत. सांगली हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असून इथं काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा असा आग्रह आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील व इतर नेत्यांनी धरला होता. आज ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करताच या नेत्यांनी थेट दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. मतदारसंघातील परिस्थितीची माहिती त्यांना दिली.

मैत्रीपूर्ण असो की शत्रुत्वाची, आदेश आला की लढणार!

काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन आल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेत एक-दोन जागांवर मतभेद होते. त्यात सांगलीची एक जागा होती. मात्र त्यांनी परस्पर ती जाहीर करून टाकली. कदाचित वाटाघाटी करण्याची त्यांची ती पद्धत असेल, पण काँग्रेसचा दावा कायम आहे. आमच्या नेत्यांनीही तसं स्पष्ट केलंय. त्यामुळं मैत्रीपूर्ण असो की शत्रुत्वपूर्ण, पक्षानं आदेश दिला तर सांगलीची जागा लढणारच, असा निर्धार विशाल पाटील यांनी बोलून दाखवला.

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं ठरलंच नव्हतं!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसनं सोडली आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. आमदार विश्वजीत कदम यांनी हा दावा खोडून काढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं काही ठरलंच नव्हतं. ते आम्हाला अजिबात मान्य नाही. छत्रपती शाहू महाराज ज्या पक्षातून लढतील, ती जागा त्या पक्षाला द्यावी असं ठरलं होतं. शाहू महाराजांनी काँग्रेसची निवड केली म्हणून ती जागा काँग्रेसकडं गेली. सांगलीचा त्या जागेशी संबंध नाही,' असं कदम यांनी स्पष्ट केलं.

Whats_app_banner