मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Complaint against BJP: लोकसभेत पराभव दिसू लागल्याने भाजपकडून ‘हिंदू-मुस्लीम’ आणि ‘पाकिस्तान’ सारखे मुद्दे प्रचारात

Complaint against BJP: लोकसभेत पराभव दिसू लागल्याने भाजपकडून ‘हिंदू-मुस्लीम’ आणि ‘पाकिस्तान’ सारखे मुद्दे प्रचारात

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 05, 2024 10:39 PM IST

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

लोकसभेत पराभव दिसू लागल्याने भाजपकडून ‘हिंदू-मुस्लीम’ मुद्दा प्रचारात
लोकसभेत पराभव दिसू लागल्याने भाजपकडून ‘हिंदू-मुस्लीम’ मुद्दा प्रचारात

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणिव झाल्यामुळेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भाजपने आज, रविवारी आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक असून निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केली आहे. लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती विरोधात तक्रार दाखल केली. 

ट्रेंडिंग न्यूज

अतुल लोंढे पुडे म्हणाले, ‘पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाल्याची जाणिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आहे. ते आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर ‘तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात?’ अशी जाहिरात दिली आहे. सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. भाजपला भारत आणि पाकिस्तान मधला फरक कळत नाही का? पंतप्रधान हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. १० वर्षात जनतेच्या हिताचे काही केले नाही त्यामुळे मतं मागण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा आधार घ्यावा लागत आहे. ‘पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्यानी खाणारा, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयला पठाणकोट येथे बोलावणारा पंतप्रधान पाहिजे की, चीनसमोर निधड्या छातीने उभा राहणारा, मणिपूर मध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा, कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी भारत जोडो यात्रा काढणारा पंतप्रधान पाहिजे’ अशी जाहिरात आम्हीही देऊ शकतो. पण आमच्याकडे कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्हाला अशी गोष्टींची आवश्यकता नाही.' असं लोंढे यांना पत्रकारांना सांगितलं.

लोकसभेची निवडणूक ही भारतात सुरु आहे. देशातले विविध राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत नाहीत. मग देशातील जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी भारतातलाच एक पक्ष विजयी होणार. भारताचे सरकार बनणार आहे. याच्याशी पाकिस्तानचा संबंध काय? पण भाजप आणि पंतप्रधान वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. हा आदर्श आचारसंहितेचा भंग तर आहेच त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ (जी), लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५, १५३ (ए), १२३ (३ए) नुसार गुन्हा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाने भाजपसोबतच ही जाहिरात देणारे त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

WhatsApp channel