Lok Sabha Election : ४ कोटींची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्ता ताब्यात, चौकशीत सांगितलं उमेदवाराचं नाव
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : ४ कोटींची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्ता ताब्यात, चौकशीत सांगितलं उमेदवाराचं नाव

Lok Sabha Election : ४ कोटींची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्ता ताब्यात, चौकशीत सांगितलं उमेदवाराचं नाव

Apr 07, 2024 09:26 PM IST

Lok Sabha Election : चेन्नईमधील तांबरम रेल्वे स्टेशनवर ४ कोटींची रोकड घेऊन जाताना तीन लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे.

४ कोटींची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्ता ताब्यात
४ कोटींची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्ता ताब्यात

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारमोहीम जोरात आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीची सुरुवात असल्याने अजूनपर्यंत पैशाचे वाटप झाल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत. मात्र त्याआधीच तब्बल ४ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाताना भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Bjp worker caught with rs 4 crore cash)

चेन्नईमधील तांबरम रेल्वे स्टेशनवर (Chennai railway station)  ४ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाताना तीन लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये एक भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तीन लोक चार बॅगा भरून रोकड घेऊन जात होते. यामध्ये चार कोटींची कॅश होती. हे तिघे ट्रेनने तिरुनेलवेलीला जात होते. तेव्हा फ्लाइंग स्क्वॉडने त्यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींमध्ये  एक भाजप कार्यकर्ताही सामील आहे. त्याचे नाव सतीश असे आहे. 

सतीश एका खासगी हॉटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल ही रोकड घेऊन जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीशने कबूल केले आहे की, तिरुनेलवेली मतदारसंघातील भाजप उमेदवार नैनार नागेंतीरन यांच्या सांगण्यावरून तीन जण रोकड घेऊन जात होते. दरम्यान प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर याचे खरे कारण समोर येणार आहे. 

चेंगालपट्टू डीईओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबारम रेल्वे स्टेशनवरून चार कोटींची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आयकर विभागाकडे सोपवला आहे. निवडणूक आचार संहिता लागू असताना १० लाखाहून अधिकची कॅश घेऊन जाताना संबंधित कागदपत्रे सोबत असावी लागतात. तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात सर्व ३९ जागांवर मतदान होणार आहे. मतदानाआधीच इतकी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याची घटना गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. 

रिपोर्टनुसार तामिळनाडू फ्लाइंग स्क्वॉडला गोपनीय माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणात रोकड नेली जात आहे. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पथकाने रेल्वे स्टेशनवर शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी सेकंड एसी कोचजवळ तीन लोकांना बॅग भरून कॅश घेऊन जाताना पकडण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या