Nilesh Lanke News : अजित पवारांना मोठा दणका! आमदार नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार-big jolt to ajit pawar parner mla nilesh lanke to join sharad pawar party ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nilesh Lanke News : अजित पवारांना मोठा दणका! आमदार नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार

Nilesh Lanke News : अजित पवारांना मोठा दणका! आमदार नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार

Mar 11, 2024 11:43 AM IST

Nilesh Lanke to Join sharad pawar party : अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार नीलेश लंके हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अजित पवारांना मोठा दणका! नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार
अजित पवारांना मोठा दणका! नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार

Nilesh Lanke to Join sharad pawar party : नगर जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण करणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जास्तीत जास्त आमदार सोबत घेऊन मोठ्या पवारांना धक्का दिला होता. अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री आहेत असंच त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात होतं. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. लोकसभेच्या जागावाटपात त्यांच्या पक्षाच्या वाट्याला समाधानकारक जागा येतील असं बोललं जात होतं. मात्र, भाजपनं अवघ्या दोन ते तीन जागांची ऑफर दिल्यामुळं अजित पवारांची कोंडी झाली आहे.

अजित पवारांची अशी कोंडी झाल्यामुळं त्यांच्यासोबत गेलेले आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले आहेत. ते पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षाकडं फिरू लागले आहेत. नीलेश लंके यांनी ती सुरुवात केली आहे. लंके हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असं पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे. ते नेमके कधी प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे.

लंके लोकसभेसाठी इच्छुक

काही वर्षांपूर्वी शिवसेनेत असलेल्या लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विजय औटी यांचा पराभव केला होता. त्यामुळं त्यांचं नाव जिल्ह्यात झालं. दांडगा लोकसंपर्क असलेले लंके हे अजित पवारांचे विश्वासू मानले जात. अजित पवारांच्या बंडानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे त्यांना साथही दिली. मात्र, आता त्यांनी विचार बदलला आहे. नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी अप्रत्यक्षपणे प्रचारालाही सुरुवातही केली आहे. महायुतीतील जागावाटपात नगरची जागा अजित पवार गटाला मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळंच लंके हे पक्षांतराच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना लंके यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चर्चेला काही अर्थ नाही, इतकंच पवार म्हणाले. अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. जे काही चाललं आहे ते अनेकांना पटत नाही, असं सूचक विधान पवारांनी केलं.