निवडणुकीच्या काळात भाजपच्या कर्नाटक प्रदेश शाखेने ‘X’ वर (पूर्वीचे twitter) पोस्ट केलेल्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना नोटीस बजावली आहे. दोन्ही भाजप नेत्यांना येत्या सात दिवसांच्या आत बेंगळुरू पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी समाजातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना दुर्लक्षित करून मुस्लिमांना निधी वाटप केल्याचे एका व्यंगचित्राच्या माध्यमातून या व्हिडिओतून दाखविण्यात आले होते. या व्हिडिओ क्लिपप्रकरणी बेंगळुरूच्या हायग्राऊंड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने समाजातील इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण रद्द करून ते मुस्लिमांना हस्तांतरित केल्याच्या जोरदार प्रचार सध्या भाजप करत आहे. हा व्हिडिओ हा या प्रचाराशी मिळताजुळता असल्यातं बोललं जात आहे.
कर्नाटकातील काँग्रेसचे नेते रमेश बाबू यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (२) (सार्वजनिक उपद्रव करणारे विधान करणे) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (विविध वर्गांमध्ये वैमनस्य वाढविणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी नड्डा आणि मालवीय यांना उद्देशून समन्स बजावले आहे.
'५ मे २०२४ रोजी रमेश बाबू यांनी हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्नाटकात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू असताना ४ मे २०२४ रोजी भाजपच्या अधिकृत सोशल नेटवर्क @bjp4karnataka 'एक्स' प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या सूचनेनुसार आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओतील मजकूर एससी/एसटी समुदायाच्या सदस्यांविरोधात वैर, तिरस्कार आणि दुर्भावना निर्माण करणारा असल्याचे मानले जात आहे. बेंगळुरूच्या हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ९५/२०२४, आरपी अॅक्ट कलम १२५ आणि भादंवि कलम ५०५ (२) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. त्यानुसार ही नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत सकाळी ११.०० वाजता हायग्राऊंड पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहे.' ' असं या समन्समध्ये म्हटले आहे.
कर्नाटकात लोकसभेसाठी दोन टप्प्यात मतदान झालं. दुसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी, ७ मे रोजी पार पडलं. लोकसभेचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपण्याच्या दोन तास आधी, मंगळवारी, निवडणूक आयोगाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)ला हा वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले होते. ‘माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणामार्फत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला हा वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यासाठी पत्र लिहिले आहे. आम्ही एक्सच्या उत्तराची वाट पाहत आहोत’ असं कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीणा यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
संबंधित बातम्या