vijay shivtare news : बारामतीमध्ये आता दोन्ही पवारांपुढं आव्हान! माजी मंत्र्याची निवडणूक लढण्याची घोषणा-baramati lok sabha election 2024 vijay shivtare to fight election against supriya sule and sunetra pawar ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  vijay shivtare news : बारामतीमध्ये आता दोन्ही पवारांपुढं आव्हान! माजी मंत्र्याची निवडणूक लढण्याची घोषणा

vijay shivtare news : बारामतीमध्ये आता दोन्ही पवारांपुढं आव्हान! माजी मंत्र्याची निवडणूक लढण्याची घोषणा

Mar 11, 2024 02:19 PM IST

Baramati Lok Sabha Election 2024 : पवार कुटुंबाचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे.

बारामतीमध्ये आता दोन्ही पवारांना आव्हान! माजी मंत्र्याची निवडणूक लढण्याची घोषणा
बारामतीमध्ये आता दोन्ही पवारांना आव्हान! माजी मंत्र्याची निवडणूक लढण्याची घोषणा

Vijay Shivtare news : पवार कुटुंबीयांतील दुहीमुळं बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा आहे. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कोण बाजी मारणार, अशी चर्चा सुरू असतानाच आता पवार कुटुंबातील या दोन्ही उमेदवारांना आता तिसऱ्या उमेदवारानं आव्हान दिलं आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक (Baramati lok Sabha Election 2024) लढण्याची घोषणा केली आहे.

पुरंदर तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री असलेल्या विजय शिवतारे हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर विरोधक आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी शिवतारे यांना पुन्हा निवडून येऊ न देण्याचा निर्धार केला होता. अजित पवारांना शिवतारे विरोधकांची साथ मिळाल्यामुळं शिवतारे यांचा खरोखरच पराभव झाला होता. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटात गेले आहेत. तर, अजित पवार यांचा गट भाजपमध्ये आल्यामुळं आता हे दोघेही महायुतीत आहेत. मात्र, बारामती लोकसभेच्या निमित्तानं अजित पवारांचा बदला घेण्याचं आवाहन शिवतारे यांनी पुरंदरच्या जनतेला केलं आहे.

आता बदला घ्यायची वेळ आली आहे!

'लोकसभा हा देशातला मतदारसंघ आहे. हा कोणाचा तरी सातबारा नाही. सतत बारामतीचाच माणूस खासदार झाला पाहिजे असं काही नाही. पुरंदरचा, भोरचाही झाला पाहिजे. का म्हणून पाच-पाच वेळा निवडून द्यायचं? काय मिळालं आपल्याला? याच पालखीतळावर अजित पवारांनी पुरंदरच्या जनतेचा अपमान केला होता. आता त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे, असं शिवतारे म्हणाले.

शिवतारे यांनी मांडलं विजयाचं गणित

विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या विजयाचं गणितही मांडलं. लवकरच मी काही गोष्टी जाहीर करणार आहे. ६ लाख ८६ हजार मतदान पवारांचं आहे आणि ५ लाख ८० हजार मतदान विरोधकांचं आहे. तुमचं-आमचं सगळ्यांचं आहे. ६ लाख ८६ हजारात दोन भाग होतील आणि ५ लाख ८० हजारामध्ये एकटा विजय शिवतारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळं दोन पवारांच्या भांडणात तिसराच उमेदवार निवडून जातो की काय, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

आता सगळ्यांनी मिळून ह्यांना पाडा!

किती दिवस आम्ही तुमची गुलामी करायची? आम्ही गुलाम होणार नाही. माझी लढाई लोकांसाठी आहे. ह्याला पाड, त्याला पाड हे आता बस्स झालं. आता सगळ्यांनी मिळून एकदा ह्यांना पाडा. इतिहास घडू द्या, असं आवाहन विजय शिवतारे यांनी केलं.