Voting in Mumbai: मुंबईत कासवगतीने मतदान, उकाड्याने हैराण अनेक मतदारांची मतदान न करता माघार; निवडणूक आयोगावर संताप
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Voting in Mumbai: मुंबईत कासवगतीने मतदान, उकाड्याने हैराण अनेक मतदारांची मतदान न करता माघार; निवडणूक आयोगावर संताप

Voting in Mumbai: मुंबईत कासवगतीने मतदान, उकाड्याने हैराण अनेक मतदारांची मतदान न करता माघार; निवडणूक आयोगावर संताप

May 20, 2024 04:40 PM IST

Slow voting in Mumbai: मुंबई शहरात अनेक मतदान केंद्रांवर अतिशय संथ गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत असल्याने मतदारांचा संताप झालेला दिसतोय.

Voters in Mumbai city queue up to cast their ballots at a polling station during the fifth phase of voting on May 20, 2024.
Voters in Mumbai city queue up to cast their ballots at a polling station during the fifth phase of voting on May 20, 2024. (AFP)

मुंबईत सहाही मतदारसंघात अतिशय संथगतीने मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने मतदार हैराण झाल्याचे चित्र आहे. अनेक मतदान केंद्रावर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत असून उन्हात तासंतास उभे राहिल्यामुळे अनेक मतदारांना चक्कर आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा पाऊस पडतो आहे. निवडणूक आयोगाच्या संथ कारभारावर सोशल मीडियावर मतदारांनी राग व्यक्त केला आहे.

मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघाचे मतदार आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आज सकाळीच लवकर घराबाहेर पडले. परंतु मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर त्यांना तासंतास उभं रहावं लागलं. गर्दी टाळण्यासाठी सकाळी ७ वाजता लवकरच मतदान केंद्र गाठलेल्या मतदारांनाही मतदानासाठी दीड ते दोन तास वाट पहावी लागली आहे. त्यानंतर ९ वाजेनंतर थोडी गर्दी वाढल्यानंतर मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांना गर्दीचं नियोजन करता येत नसल्याचं दिसून आलं. काही बुथवर सकाळी ९ वाजता रांगेत लागलेल्या मतदारांना दुपारी दोन वाजता मतदान करता आलं. मुंबईत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील प्रतीक्षा नगर, सायन, ठाणे मतदारसंघात मुंब्रा, पवई इत्यादी ठिकाणी मतदारांना हा अनुभव आला आहे. कासवगतीने मतदान होत असल्याने मुंबई शहरातली मतदानाची आकडेवारी अतिशय हळूवारपणे वाढते आहे. दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार मुंबई (दक्षिण)-२४.४६ टक्के, मुंबई (दक्षिण-मध्य)-२७.२१ टक्के, मुंबई (उत्तर-मध्य)- २८.०५ टक्के, मुंबई (ईशान्य)-२८.८२ टक्के, मुंबई (वायव्य)- २८.४१ टक्के, मुंबई (उत्तर)- २६.७८ टक्के असे मतदान झाल्याचे दिसून आले आहे.

मुंब्र्यात जाणूनबूजून मतदान संथगतीनेः जितेंद्र आव्हाडांचा आरोप

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मुंब्रा येथेही आज सकाळपासून अतिशय संथगतीने मतदान होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंब्र्यात जाणूनबूजून संथगतीने मतदान प्रक्रिया पार पाडली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पवईमध्ये संथगतीने मतदान; ईव्हिएम मशीन बदलले

मुंबई उपनगरात पवई भागात आज सकाळी फार संथगतीने मतदानाची प्रक्रिया सुरू होती. या मतदान केंद्रावर शिवसेना (शिंदे गट) आमदार दिलीप लांडे यांनी भेट दिली. या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट)चे नेते, सिने अभिनेता आदेश बांदेकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मतदान संथगतीने होत असल्याचे दिलीप लांडे यांनी सांगितले. तक्रार केल्यानंतर या मतदान केंद्रावर कर्मचारी संख्या वाढवण्यात आली. तसेच मशीन बदली करण्यात आल्याचे लांडे म्हणाले.

मतदान केंद्रांवर सुविधांचा अभावः आदित्य ठाकरे

मुंबईतील मतदान केंद्रावर मतदारांसाठी सोईसुविधा फार कमी असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. अनेक मतदार उन्हात उभे असून काहींना चक्कर देखील आलेली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, पंख्याची सोय नाही. ही संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही (राजकीय पक्ष) तेथे काहीच करू शकत नाही. प्रयत्न जरी केला तरी आमच्या केस करण्यात येईल, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संथ गतीने मतदान का होतय? देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगाकडे विनंती

मुंबई तसेच परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांवरुन येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे. तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच मतदानाची गती वाढेल, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

 

 

Whats_app_banner