दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे भाजपशी लढत होते. त्यांना ऐन निवडणुकीच्या काळात अटक केल्याने जगभरात भारताची बदनामी झाली आहे, असा आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. शिवसेना (ठाकरे गटाचे) यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी येथील पोस्टल मैदानात इंडिया आघाडीची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.
'यवतमाळ वाशिम मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 'संजय देशमुख हे सर्वसामान्य लोकांचे उमेदवार आहेत. त्यांना आपण दिल्लीला पाठविणार आहोत. मात्र समोरून अद्याप उमेदवार सुद्धा जाहीर झालेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ७२ तास उरले आहेत. पण येथे विरोधकच नाही. हे सगळे लोक घाबरले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सभेसाठी आलेली प्रचंड जनता ही पैसे देऊन आणलेली नाही तर स्वतः बदलासाठी उत्स्फूर्तपणे आलेली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. भाजप सोबत कोणी नव्हतं तेव्हा शिवसेना म्हणून आम्ही सोबत राहिलो. त्यांचे ‘अच्छे दिन’ आले तेव्हा त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडली. ‘वापरा आणि फेका’ ही त्यांची वृत्ती दिसून येते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांना यावेळी 'अबकी बार, भाजपा तडीपार'चा नारा दिला. २०२४च्या निवडणुकीत देशात परिवर्तन घडणार आहे असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अश्रू धुराचे नळकांडे फोडले, पण स्वामिनाथन आयोग लागू झाला का? महिलांचा अपमान झाला. या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाला, मात्र अत्याचार करणाऱ्याला मंत्रिमंडळात बसवलं जातं. ज्या बिल्किस बानोवर अत्याचर झाला, त्या आरोपीचा सरकारकडून सत्कार केला जातो. त्यामुळे जनता ‘इंडिया आघाडी’ सोबत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दिल्लीत नुकतीच ‘इंडिया आघाडी’ची सभा झाली. ती प्रचारसभा नव्हती. अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांना ताकद देण्यासाठी ती सभा होती. दिल्लीकर नागरिक मोठ्या संख्येने दिल्लीत सभेला उपस्थित होते. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागा कॉग्रेस आणि आप मिळून जिंकेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांना व्यक्त केला.
संबंधित बातम्या