Lok Sabha election 7 phase voting : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. देशभरात एकूण ५७ जागांवर मतदान होत आहे. यात पश्चिम बंगालमधील काही जागांचाही समावेश आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनेक ठिकाणांहून गोंधळ व हिंसाचाराचं वृत्त आहे. एका ठिकाणी मतदारांनी आपला राग ईव्हीएमवर काढला आहे.
पश्चिम बंगालच्या जयनगर लोकसभा मतदारसंघातील कुलटाळी इथं काही लोकांना मतदानाला जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम ताब्यात घेतलं आणि तलावात फेकून दिलं. ही घटना कुलटलीच्या मेरीगंज क्रमांक २ झोनमधील बूथ क्रमांक ४० आणि ४१ मध्ये घडली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र पोलीस पथकालाही अटकाव करण्यात आला. रस्त्याच्या मधोमध झाडाच्या फांद्या टाकून पोलिसांचं वाहन थांबवण्यात आल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षांच्या पोलिंग एजंटना तृणमूल काँग्रेस बसूच देत नसल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अशोक कंडारी यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय दलांकडेही बोट दाखवलं.
सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांच्या एका गटाला बूथवर बसू दिलं गेलं नाही. त्यांना एवढ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की, ते उठूही शकत नव्हते. पोलिस आले आणि काहीही करू शकले नाहीत. तृणमूलचा आशीर्वाद असलेल्या बदमाशांनी त्यांना मतदान करण्यापासून रोखल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
या सर्व गोंधळात व हाणामारीत भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला. या घटनेबाबत पीडित भाजप कार्यकर्त्याच्या आईनं सांगितले की, त्यांचा मुलगा यावेळी भाजपचा बूथ एजंट झाला आहे. मात्र बूथवर बसायला गेल्यावर त्याला पकडून मारहाण करण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले. या घटनेची दखल घेत आयोगानं तपास सुरू केला आहे.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार होती, मात्र मेरीगंज झोन २ मधील ४० आणि ४१ बूथवर मतदान विस्कळीत झाले. नंतर तिथं पर्यायी ईव्हीएम आणून मतदान सुरू करण्यात आलं. पंचायत निवडणुकीच्या वेळी राज्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. तेव्हा देखील मतदान यंत्र पाण्यात फेकून देण्यात आलं होतं.
भाजप उमेदवारानं दिलेल्या माहितीनुसार, बूथवर बसण्याचा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे. मात्र, गावातील महिला एजंटांना बसूच दिलं जात नव्हतं. त्यामुळं त्या बूथ क्रमांक ४० आणि ४१ वर जमल्या. सर्व महिलांनी एकजूट दाखवत ईव्हीएम पाण्यात फेकून दिलं.
संबंधित बातम्या