mns bjp alliance : महायुतीत मनसेला फक्त एक जागा, बाकी कुठलीही कमिटमेंट नाही!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  mns bjp alliance : महायुतीत मनसेला फक्त एक जागा, बाकी कुठलीही कमिटमेंट नाही!

mns bjp alliance : महायुतीत मनसेला फक्त एक जागा, बाकी कुठलीही कमिटमेंट नाही!

Updated Mar 20, 2024 11:39 AM IST

MNS BJP Alliance : महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या मनसेला भाजपकडून लोकसभेच्या एका जागेव्यतिरिक्त कुठलीही कमिटमेंट देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे.

महायुतीत मनसेला फक्त एक जागा, बाकी कुठलीही कमिटमेंट नाही!
महायुतीत मनसेला फक्त एक जागा, बाकी कुठलीही कमिटमेंट नाही! (ANI)

BJP MNS Alliance : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपप्रणित महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, महायुतीमध्ये मनसेच्या वाट्याला लोकसभेची फक्त एक जागा येणार असल्याचं कळतं. तसंच, पुढील निवडणुकांबाबत त्यांना कुठलाही शब्द देण्यात आला नसल्याचंही सूत्रांकडून समजतं.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपनं राज ठाकरे यांच्या मनसेलाही साद घातली आहे. मनसेनंही भाजपच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत युतीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं समजतं. मनसेला लोकसभेच्या दोन ते तीन जागा मिळाव्यात असा प्रस्ताव होता. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी या जागांचा समावेश होता. मात्र, अमित शहा यांनी तो स्पष्टपणे फेटाळून लावला.

नाशिकची जागा ही महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. तिथं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अशा परिस्थितीत ती जागा मनसेला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दक्षिण मध्य मुंबईची जागाही शिंदे गटाकडं आहे. तिथं विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे पुन्हा रिंगणात आहेत. त्यामुळं तीही शक्यता दुरापास्त आहे. शिर्डीची एक जागा असली तरी मनसेला दोन जागा देण्याची सध्या भाजपची तयारी नसल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यांंना केवळ एकच जागा दिली जाणार आहे. तसं अमित शहा यांनीही स्पष्ट केलं आहे.

विधानसभा किंवा महापालिकांबद्दल कुठलंही आश्वासन नाही!

राज ठाकरे यांच्यासारखा फर्डा वक्ता सोबत असल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देणं भाजपला सोपं जाणार आहे. केवळ लोकसभाच नव्हे, तर विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्येही त्यांचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळं विधानसभा आणि महापालिकांमध्ये नेमकं काय मिळणार याबद्दल काही तरी आश्वासन भाजप देईल, अशी आशा मनसेला होती. मात्र, आताच तसा कुठलाही शब्द देण्यास भाजपनं नकार दिला आहे. सध्या लोकसभेचं बघू, इतर निवडणुकांचं त्या-त्या वेळी बघू असं अमित शहा यांनी राज ठाकरेंना सांगितल्याचं बोललं जातं. ते सांगताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत झालेल्या विसंवादाचा दाखलाही दिल्याचं कळतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या