मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Lok Sabha Elections Result 2024 : राजकीय पीचवर युसूफ पठाणची दमदार बॅटिंग, कॉंग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

Lok Sabha Elections Result 2024 : राजकीय पीचवर युसूफ पठाणची दमदार बॅटिंग, कॉंग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

Jun 04, 2024 02:55 PM IST

Lok Sabha Elections Result 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. पठाणने कॉंग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी यांच्यावर १० हजार मतांची आघाडी घेतली आहे.

Lok Sabha Elections Result 2024 : राजकीय पीचवर युसूफ पठाणची दमदार बॅटिंग, कॉंग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना मागे टाकलं
Lok Sabha Elections Result 2024 : राजकीय पीचवर युसूफ पठाणची दमदार बॅटिंग, कॉंग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना मागे टाकलं (PTI)

Lok Sabha Elections Result 2024, Yusuf Pathan : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला. युसूफ पठाण पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. येथे त्याची लढत काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी आणि भारतीय जनता पक्षाचे डॉ. निर्मलकुमार शहा यांच्याशी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू असून, यामध्ये युसूफ पठाण सुमारे १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पठाण काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यापेक्षा मागे असल्याचे दिसून आले. पण, आता युसूफने मोठी आघाडी मिळवली आहे.

युसूफ पठाण पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्याने निवडणुकीआधी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पठाण पहिल्यांदाच निवडणुकीच्या खेळपट्टीवर चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना दिसत आहे. बहारमपूरचे विद्यमान खासदार अधीर रंजन चौधरी यांना तो कडवी टक्कर देत आहेत.

अधीर रंजन चौधरी यांनी २०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा सरकार यांचा ८०,६९६ मतांनी पराभव केला होता. अधीर रंजन सलग ५ वेळा या जागेवरून खासदार झाले आहेत. १९९९ मध्ये पहिल्यांदा त्यांना या जागेवरून खासदारकी मिळाली. पण आता पहिल्यांदाच निवडणूक लढणारा युसूफ पठाण त्यांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अधीर रंजन चौधरी सहाव्यांदा खासदार होतात की युसूफ पठाण त्यांचे वर्चस्व संपवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हे अंतिम निकाल आल्यानंतरच कळेल.

युसुफ पठाणची कारकीर्द

युसूफ पठाणने आपल्या वनडे कारकिर्दीत ४१ एकदिवसीय डावात एकूण ८१० धावा केल्या. या ४१ डावांमध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. युसूफ पठाणने भारतासाठी १८ टी-20 डावात एकूण २३६ धावा केल्या. गोलंदाजीत युसूफने एकदिवसीय सामन्यात ३३ आणि टी-20 सामन्यात १३ विकेट्स घेतल्या.

वर्ल्डकप फायनलमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण

युसूफ पठाणचे टी-20 पदार्पण खूपच खास. वीरेंद्र सेहवाग २००७ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी जखमी झाला होता. त्याच्या जागी एमएस धोनीने युसूफ पठाणला संधी दिली. धोनीने युसूफ पठाणला सलामीला पाठवले. मात्र, युसूफ पदार्पणाच्या सामन्यात काही खास करू शकला नाही, त्याला ८ चेंडूत केवळ १५ धावा करता आल्या. पण त्याने त्या वर्ल्डकप फायनलमध्ये एक शानदार  षटकार ठोकला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४