Mamta Banerjee targeted Rahul Gandhi: लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९४ जागा जिंकल्या आहेत. त्याच वेळी, इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. या यशानंतर इंडिया आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्याचा दावा देखील करू शकते. असे असतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र राहुल गांधींवर टीका केली आहे. बॅनर्जी यांच्या टीकेवरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
राहुल गांधींवर हल्लाबोल करताना बॅनर्जी म्हणाल्या, मी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले, मी शरद पवारांचे अभिनंदन केले, मी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे देखील अभिनंदन केले, मी राहुल गांधींना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, परंतु ते इतके व्यस्त आहेत की त्यांनी मला माझ्या शुभेच्छांचा प्रतिसाद देखील दिला नाही. राहुल गांधी यांनी जरी मला प्रतिसाद दिला नाही तरी माझ्याकडे गमावण्यासारखे फारसे काही नाही. मी त्यांना सांगितले होते की दोन जागा घ्या आणि लढा, नाहीतर त्याही मिळणार नाहीत. आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही, आणि मी खरे ठरले. कॉँग्रेसचा बंगालमध्ये केवळ एका जागेवर विजय झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया अलायन्सची कामगिरी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या 'अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये खूप चांगले काम केले आहे. मी त्याचे अभिनंदनही केले आहे. मला वाटते की विधानसभा निवडणुकांमध्येही ते चांगली कामगिरी करून सत्ता स्थापन करतील.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने लोकसभेच्या ४२ पैकी २९ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला येथून केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर भाजपला येथून १२ जागा जिंकण्यात यश आले आहे.
संबंधित बातम्या