लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित होत असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना इंडिया आघाडीत येण्याची विनंती केल्याचं समजतं. इंडिया आघाडीत आल्यानंतर तुम्हाला उपपंतप्रधान पद देऊ, अशी ऑफर पवारांनी नितीश कुमार यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणूक निकाल हळूहळू स्पष्ट होत असून भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने मुंसडी मारत विक्रमी यश मिळवल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए आघाडी २९३ जागांवर तर इंडिया आघाडी २३३ जागांवर पुढे असल्याचे दिसते. त्यातच आता शरद पवारांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना (Nitish Kumar) फोन करत राजकीय फासे फेकण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही बदलेल्या निकालांनी सतर्क झाले असून त्यांनी तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडूंना (N. Chandrababu Naidu) यांना फोन करून पाठिंबा देण्याची मागणी केल्याचे समजते. त्यातच काही वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते काय बोलतील याकडे लक्ष लागले आहे. पवारांच्या खेळीमुळे पंतप्रधान मोदींसह भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष १५ जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा या २८ ते ३० च्या आसपास आहेत. यावेळी राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात जबरदस्त फटका बसल्याने त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आता मित्रपक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, लोकांनी त्यांना दूर केलं आहे. त्याला काहीतरी कारणं देणं गरजेचं आहे म्हणून ते लोक असे आरोप करत आहेत. लोकांनी विचारपूर्वक हा निकाल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझी नितीशकुमार आणि चंंद्राबाबूंशी चर्चा झाल्याच्या बातम्या येत आहेत, पण त्यात तथ्य नाही. माझी चर्चा फक्त खर्गे व येच्युरी यांच्याशी झाली असल्याचं शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या