मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray : राज ठाकरेंकडून भरसभेत अजित पवारांचे कौतुक, म्हणाले 'शरद पवारांसोबत राहूनही या माणसाने कधीच..'

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून भरसभेत अजित पवारांचे कौतुक, म्हणाले 'शरद पवारांसोबत राहूनही या माणसाने कधीच..'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 10, 2024 10:57 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंची आज पुण्यात सभा पार पडली. यात त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसवर जोरदार टीका केली मात्र अजित पवारांच्या भूमिकेचे कौतुक केले.

राज ठाकरेंकडून अजित पवारांचे कौतुक
राज ठाकरेंकडून अजित पवारांचे कौतुक

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी पुणे मतदारसंघात मतदान होणार आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मौलवी आणि मशिदीकडून मतदानासाठी फतवे निघत असल्याचं निर्देशनास आणत फतवे काढणाऱ्यांना चांगलंच  ठणकावलं.  तसेच मीही फतवा काढत आहे की मुरलीधर मोहोळ यांना मतदान करा. काँग्रेस, शरद पवार व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केलं. 

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरुन जोरदार प्रहार केला. 

राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधत त्यांच्यावर जातीपातीचे राजकारण केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांचे कौतुक केले. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी  १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झाले, भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यात आले. मात्र अजित पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर राहूनदेखील कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही, असं राज ठाकरे म्हणाले. अजित पवारांच्या आजपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी पाहत आलोय. माझे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील, पण मी जेवढं त्यांना ओळखतो, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही.

मी फतवा काढतो महायुतीला मतदान करा – राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघत आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. मुसलमान समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे, असे फतवे निघत आहेत. मात्र, या देशात अनेक मुसलमान आहेत, ते या वाटेला जाणार नाहीत. हे फतवे काढणारे मुस्लीम समाजाला काय समजतात, ही तुमची घरची गुरं-ढोरं आहेत का, असा सवालही राज ठाकरेंनी केला. हे जर फतवे काढणार असतील तर मी पण आज फतवा काढतो. हिंदूंनी मोहोळ यांना मतदान करा. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा.

WhatsApp channel