PM Modi : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशा स्थितीत शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीसाठी ५ ते ९ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन पाहुण्यांसाठी बंद राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सलग तिसरा विजय ऐतिहासिक क्षण असल्याची भावना, काल रात्री कार्यकर्त्यांशी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना व्यक्त केली. सलग तिसऱ्यांदा निवडणूक दिल्याबद्दल त्यांनी देशातील जनतेचे आभार देखील मानले आहेत. देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युती नव्या ताकदीने काम करेल, अशी भावना मोदीनी व्यक्त केली होती.
१८ व्या लोकसभेचे निकाल मंगळवारी जाहिर झाले. या निकालावर व्यक्त होताना मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केली असून त्यात मोदी म्हणाले, "देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. हा अभूतपूर्व क्षण आहे. जनतेने दाखवलेल्या या प्रेमामुळे मी त्यांचा कृतज्ञ आहे जनतेच्या आशीर्वादासाठी मी देशवासीयांना आश्वासन देतो की आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि समर्पणाने पुढील पाच वर्षात जोमाने काम करू. त्याबद्दल मी जनतेचे मनापासून आभार मानतो व सर कार्यकर्ते आणि पदाधीकाऱ्यांचे अभिनंदन करतो.”
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या मतमोजणीच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला २९२ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर विरोधी 'इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात यश आलेले नाही. पण संसदेच्या ५४३ जागांपैकी २४० जागा भाजपला मिळाल्या आहेत.
संबंधित बातम्या