मराठी बातम्या  /  elections  /  Amravati Loksabha : नवनीत राणांना उमेदवारी नको, अमरावतीतील भाजप नेत्यांचं फडणवीसांना साकडं

Amravati Loksabha : नवनीत राणांना उमेदवारी नको, अमरावतीतील भाजप नेत्यांचं फडणवीसांना साकडं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 26, 2024 10:31 PM IST

Navneet Rana : अमरावतीतीलभाजपाच्या नेत्यांनीराणांच्या उमेदवारीला विरोध करतनवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, असं साकडं फडणवीसांना घातलं आहे.

अमरावती भाजपकडून नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध
अमरावती भाजपकडून नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र अमरावतीमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी संभाव्य उमेदवाराविरोधात मोर्चा उघडला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघ युती-आघाडीतील घटकपक्षांना जात असल्याने मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू आहे. त्यातच काही जागांवर संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीत रामटेक व अमरावती मतदारसंघावरून जोरदार कलह निर्माण झाला होता. भाजपने अमरावती मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याने शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कट झाला तर नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र आता त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे.

रामटेक व अमरावती मतदारसंघासाठी महायुतीतील वादावर तोडगा काढताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शिंदे गटरामटेकची तर भाजप अमरावतीची जागा लढवेल. त्यानंतर अमरावतीमध्ये तगडा भाजप नेता नसल्याने येथे विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता अमरावतीतील भाजपाच्या नेत्यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध करत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, असं साकडं फडणवीसांना घातलं आहे.

अमरावती जिल्हा भाजप कार्यकारिणीचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांनी फडणवीसांना विनंती केली की, तुम्ही काहीही करा, दुसरा कोणताही उमेदवार द्या मात्र नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका.

दरम्यान महायुतीतील घटकपक्ष प्रहार संघटनेचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी देखील राणांच्या उमेदवारीला विरोध करत अमरावतीमध्ये आपण युती धर्म पाळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अमरावतीतून प्रहार संघटनेचा उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

अमरावती मतदारसंघात आमची मोठी ताकद असून अमरावतीमध्ये आम्ही महायुतीच्या उमेदवाराविरोधात उमेदवार देणार आहोत. ६ एप्रिल रोजी उमेदवाराची घोषणा केली जाईल, तसेच हा उमेदवार भाजपमधीलच असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत.

WhatsApp channel