huge cash found in ed raid in ranchi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्याशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या घरातून ईडीने नोटांचा ढिगारा जप्त केला आहे. ही रक्कम कोट्यावधीत असल्याचा अंदाज आहे. नोटा मोजण्यासाठी बँकचे कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठे घबाड ईडीच्या हाती लागल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि १७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती, हा योगायोग आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रांची झारखंडमधील रांची येथे छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनी ही मोठी रक्कम जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड २० ते ३० कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत.
ईडीने रांचीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकत आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांच्या घरावरही ईडीची झडती सुरू होती. यावेळी अधिकाऱ्यांना जहांगीरच्या घरात ही रोकड सापडली आहे.
ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडीने हा छापा टाकला होता. वीरेंद्र के राम यांना फेब्रुवारी २०२३मध्ये अटक करण्यात आली होती. काही योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता आणि मनी लाँड्रिंगचे आरोप झाल्यानंतर ईडीने वीरेंद्रपर्यंत पोहोचले होते. आता रोकड जप्त केल्यानंतर ईडी या प्रकरणात आणखी अनेकांना अटक करू शकते.
आलमगीर आलम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडच्या चंपाई सोरेन सरकारमधील मंत्री आहेत. याआधी ते हेमंत सोरेन सरकारमध्ये मंत्रीही होते. ते विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. आलमगीर आलम हा साहिबगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. आलमगीर हे जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडीच्या आघाडी सरकारमध्ये खूप शक्तिशाली मानले जातात. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध असतानाही त्यांना चंपाई सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री करण्यात आले.
संबंधित बातम्या