Vijay Wadettiwar on Eknath Sinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची, जागावाटपाची आणि उमेदवार निश्चितीची लगबग सुरू असतानाच काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘महायुतीतील एकनाथ शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत,’ असा दावा त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी गोटामध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून तिढा आहे. तर, महायुतीमध्ये अधिकच गोंधळाची परिस्थिती आहे. नाशिक, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण अशा अनेक जागांवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. तर, काही जागांवर भाजपच्या तीव्र विरोधामुळं शिंदे गटाच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलं आहे. हिंगोलीतील उमेदवार मागे घेण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे.
महायुतीमधील या गोंधळावर विजय वडेट्टीवर यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांची अवस्था वाईट असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे भेटत नाहीत, बोलत नाहीत अशा तक्रारी करून काही खासदार शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, आता त्या खासदारांना साधं लोकसभेचं तिकीट मिळत नाही अशी त्यांची गत झाली आहे. ना घर का, ना घाट का… अशी त्यांची अवस्था झाली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
खासदारांना तिकिटासाठी इतकं झगडावं लागत असेल तर विधानसभा निवडणुकीला काय होईल या कल्पनेनं शिंदे समर्थक आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिंदे यांचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची आमची माहिती आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
‘महाविकास आघाडीचे विरोधक पुरते गोंधळलेले आहेत. शिंदे गट गोंधळलेला आहे. अजित पवार गट गोंधळलेला आहे. भाजपचीही अनेक ठिकाणी उमेदवार निवडताना दमछाक झाली आहे. सगळे त्रस्त आहेत. कुठे कोणता उमेदवार देऊ असा प्रश्न भाजपपुढं आहे. नाव घ्यावं तो हरेल अशी स्थिती आहे,’ असंही वडेट्टीवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून जी नाराजी आहे ती स्वाभाविक आहे. परंपरागत जागा जाते, तेव्हा अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तो वाद आम्हाला फार ताणायचा नाही. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे सांगलीत सगळे काम करतील,' असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.