Lok sabha Election 5 phase voting : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ पासून सुरुवात झाली आहे. मात्र, मतदान सुरू होण्यापूर्वी काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे. ठाण्यातील नौपाडा येथील एका मतदान केंद्रवार दोन ईव्हीएम मशीन हे बंद पडले होते. यामुळे तब्बल ४५ मिनिटे ते तास भर हे मशीन बंद होते. यामुळे या ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान होऊ शकले नाही. सकाळी ७ पूर्वीच या मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, ईव्हीएम मशीन बंद असल्याने येथील मतदान खोळंबले होते. वाट बघूनही बराच वेळ मतदान सुरू न झाल्याने काही मतदार मतदान न करताच माघारी गेले. या बाबत या मतदार संघातील लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर नाराजी व्यक्त करत या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
राज्यात आज सकाळी ७ पासून पाचव्या टप्प्यातील मंतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई उत्तर, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण येथेही मतदान होणार आहे. आज सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली.
या मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. तर २ कोटी ४६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. १६० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात ५ अतिरिक्त पोलिस आयुक्त, २५ पोलिस उपआयुक्त, ७७ सहायक पोलिस आयुक्तांसह २५ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. याशिवाय ३ दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह केंद्रीय सुरक्षा दलाच्या ३६ तुकड्यांची अतिरिक्त कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे.
सकाळी मतदानाला सुरूवात झाली तेव्हा ठाण्यातील नौपाडा येथील एका मतदान केंद्रवार दोन ईव्हीएम मशीन हे बंद पडले. या मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ वाजता मंतदानाची वेळ सुरू झाली. मात्र, या केंद्रावर मतदान सुरू करण्यात आले नाही. मतदान सुरू न झाल्याने नागरिकांनी या बाबत केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली. या वेळी त्यांनी ईव्हीएम सुरू होत नसल्याचे सांगितले. यंत्रात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे मतदारांना सांगण्यात आले. तब्बल पाऊणे आठ वाजेपर्यंत येथील मतदान यंत्रातील बिघाड हा दुरुस्त झाला नव्हता. ठाण्यात दिव्यांग कला केंद्र, जिजामाता उद्यानात मशीन बंद पडले. येथे देखील काही मतदार हे मतदान न करताच माघारी फिरले.
दरम्यान, येथील अधिकाऱ्यांनी मतदारांना सांगितले की, ७ नंतर बिघाड दुसरूस्त करता येईल. काही मतदारांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, आम्ही येथे ६.३० वाजता पासून मतदान करण्यासाठी आलो आहोत. मात्र, ७.४५ झाले तरी मतदान हे ईव्हीएम मशीनच्या बिघाडामुळे मतदान सुरू झाले नव्हते. त्यामुळे अनेक जण माघारी गेले.
या संदर्भात, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी या केंद्रांवर येऊन पाहणी केली. ते म्हणाले, या मतदान केंद्रांवर मतदारांचा सकाळ पासून उत्साह आहे. अनेकांनी या ठिकाणी रांगा लावल्या आहेत. मात्र, मशीन बंद असल्याने अनेक जण मतदान न करता माघारी परतले आहे. या केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना येथील मतदान यंत्रातील बिघाड दुरुस्त करता आला नाही. या बाबत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. दरम्यान तासाभरानंतर येथील मशीन सुरू झाले. यानंतर मतदान सुरू झाले. नरेश म्हस्के यांनी या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ वाढून मिळावी अशी देखील मागणी केली आहे.
संबंधित बातम्या