सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज, शनिवारी सकाळी दिल्लीतील मध्यवर्ती भागात असलेल्या कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात पोहोचले. यावेळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि 'आप'चे राज्यसभेचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. ५० दिवस जेलमध्ये काढल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी आलेले केजरीवाल यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
‘हनुमानजींचा आशीर्वाद, कोट्यवधी लोकांच्या प्रार्थना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा न्याय यामुळे मी तुमच्या सर्वांमध्ये परत आल्याचा खूप आनंद होत आहे’, असं केजरीवाल यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले आहे. दरम्यान, केजरीवाल हे आज शनिवारी दुपारी एक वाजता पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे.
अरविंद केजरीवाल हे आज, शनिवारी दुपारी चार वाजता दक्षिण दिल्लीतील महरौली येथे रोड शो करणार आहे. आज होणारा केजरीवाल यांचा 'रोड शो' हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतला दिल्ली शहरातला त्यांचा पहिलाच रोड शो असणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील केजरीवाल यांच्यासोबत आजच्या ‘रोड शो’मध्ये सहभागी होणार आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तब्बल ५० दिवस जेलमध्ये काढल्यानंतर केजरीवाल यांनी काल, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता.
‘मी लवकरच बाहेर येईन, असं मी म्हणालो होतो. आता मी बाहेर आलोय. सर्वप्रथम मला हनुमानजींच्या चरणी वंदन करायचे आहे. हनुमानजींच्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्यात आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. देशभरातील कोट्यवधी लोकांनी मला आशीर्वाद आणि प्रार्थना पाठवली. मी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार मानू इच्छितो. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करा, अशी मी सर्वांना विनंती करतो. मी सर्व ताकदीनिशी हुकूमशाहीविरोधात लढत आहे. पण देशातील १४० कोटी जनतेला हुकूमशाहीशी लढावे लागेल’ असं केजरीवाल यांनी शुक्रवारी तिहार कारागृहाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले होते.