Narendra Modi attacks Congress Samajawadi Party : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचाराचा रोख पुन्हा एकदा राम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर वळवला आहे. 'समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सत्तेत आल्यास अयोध्येतील राम मंदिरावरून बुलडोझर चालवतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आवर्जून कौतुक केलं. 'योगींनी बेकायदा बांधकामं आणि गुन्हेगार व दंगलखोरांची घरं पाडली म्हणून त्यांचे समर्थक त्यांना प्रेमानं 'बुलडोझर बाबा' म्हणून संबोधतात. सपा आणि काँग्रेस सत्तेत आल्यास रामलल्ला पुन्हा तंबूत असतील आणि ते राम मंदिरावर बुलडोझर चालवतील. बुलडोझर कुठं चालवावा आणि कुठं नाही हे शिकण्यासाठी इंडिया आघाडीनं योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकवणी घेतली पाहिजे, असा टोलाही मोदी यांनी हाणला.
'भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाच्या भल्यासाठी काम करत आहे. तर, दुसरीकडं इंडिया आघाडी देशात अराजक माजवत आहे. निवडणुका जसजशा पुढं सरकत आहेत, तसतशी इंडिया आघाडीत फूट पडत आहेत. देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मात्र, सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून भाजप हॅटट्रिक करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे बसपच्या प्रमुख मायावती यांना बुआ (आत्या) म्हणत. तोच धागा पकडून मोदी म्हणाले, समाजवादी राजपुत्राला (अखिलेश यादव) ममता बॅनर्जी यांच्या रूपानं नवी आत्या मिळाली आहे, नव्या आत्याचा त्यांना आश्रय मिळाला आहे. ही नवीन आत्या पश्चिम बंगालमध्ये आहे आणि या आत्यानं इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आहे, याकडंही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधलं.
काँग्रेसनं अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय बदलण्याची योजना आखल्याचा आरोप मोदींनी केला. 'काही लोकांना यावर विश्वास बसणार नाही. पण कुठल्याही संभ्रमात राहू नका... स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशाचं विभाजन होऊ शकत नाही असं लोक म्हणत होते. मात्र, तसं झाले, काँग्रेसनं ते केलं. ते कुठल्याही थराला जाऊ शकतात; त्यांचा भूतकाळच तसा आहे. त्यांच्यासाठी देश काहीही नाही, कुटुंब आणि सत्ता हेच सर्वस्व आहे, असं मोदी म्हणाले.
संबंधित बातम्या