Congress alleged Ujjwal Nikam : राज्यात लोकसभा निवडणुकीचा ५ व्या टप्प्यातील निवडणूक २० मे रोजी होणार आहे. मात्र, या पूर्वी पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचे मुंबईत घर असतांनाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी राज्य सरकारकडून १७ लाख रुपये घेतल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. या बाबत उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी आरोप केला की, मुंबई उत्तर मध्य येथील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी २०१० मधील २६/११ हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी सांभाळताना हॉटेलमध्ये राहण्यासाठी राज्य सरकारकडून १७ लाख रुपये घेतले. मात्र, राज्य सरकारच्या कोट्यातून सरकारने त्यांना २०१० मध्ये वर्सोवा येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरनात (म्हाडा) फ्लॅट दिला होता. निकम यांचे मुंबईत आधीच घर असताना त्यांनी सरकारी तिजोरीतून पैसे का घेतले याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेले आरोप उज्ज्वल निकम यांनी फेटाळून लावले आहेत. निकम म्हणले, त्यांनी लावलेले बिल हे विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्त करताना स्वीकारलेल्या अटींचा भाग होता. लोकसेवक नसल्यामुळे नैतिकतेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निकम यांनी म्हटले आहे.
सावंत म्हणाले की, २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील नियुक्त केली आणि प्रत्येक सुनावणीसाठी ५० हजार आणि इतर अनेक भत्ते दिले. पण त्याला २०११ ते २०१४ या कालावधीत हॉटेलमध्ये राहण्याचे बिल राज्य सरकारने नंतर मंजूर केले, असेही ते म्हणाले.
उज्ज्वल निकम म्हणाले, “मी राज्य सरकारचा कर्मचारी नाही. मला अनेक अटींवर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कुठे राहायचे आणि कुठे नाही हा माझा निर्णय होता. तत्कालीन राज्य सरकारने त्या सर्व अटी मान्य केल्या. सचिन सावंत यांनी विशेष सरकारी वकिलाची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. इथे नैतिकतेचा प्रश्नच येत नाही, असे निकम म्हणाले. निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत.