Rahul Gandhi News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. या साठी भाजप आणि काँग्रेसतर्फे जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका प्रचार रॅली दरम्यान, ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने अनेक चुका केल्या असल्याचे मान्य केले. या चुका ती सुधारण्याची भाषा देखील त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासंदर्भातही परीक्षणात्मक वक्तव्य केल्याने त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल, असे म्हटल्याने आगामी काळात पक्षात होणाऱ्या बदलांचे सुतोवाच त्यांनी केले आहे.
शुक्रवारी येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित 'राष्ट्रीय संविधान परिषदे'ला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागणार आहे हे सत्य आहे. "काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत. मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे." मात्र, या चुका नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत त्यांनी भाषणात स्पष्ट खुलासा केला नाही.
राहुल गांधी यांनी आरक्षण, जातिव्यवस्था तसेच संविधानावरील कथित हल्ल्यांबाबतही टीका केली. राहुल गांधी म्हणाले, देशातील मोठ्या संख्येने लोकांचे भविष्य हे त्यांच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. राहुल म्हणाले, "लोक छोट्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले आहेत. सध्या राज्यघटनेच्या मूलभूत पायावरच हल्ला केला जात आहे. हे गट ठरवतात की त्याचे सदस्य कोणत्या कामासाठी पात्र आहेत आणि ते कोणती कामं करू शकत नाहीत”.
राहुल गांधी म्हणाले, "भारतातील करोडो लोक असे जीवन जगले आहेत जिथे त्यांनी त्यांचे भविष्य ठरवले नाही. परंतु समाजाने त्यांच्यासाठी ते केले आहे. अनेकांनी हे वास्तव स्वीकारले आणि ते बदलण्यासाठी उभे देखील राहिले." आयुष्यभर राजकारणात सत्तेच्या मागे धावणाऱ्यांना हे वास्तव मान्य नाही, असे राहुल म्हणाले.
देशातील जातीव्यवस्थेमुळे देशवासीयांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालं आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा ऱ्हास होत आहे. “देशातील कोट्यवधी लोकांना अशाच प्रकारे जन्माच्या आधीच निश्चित झालेलं आयुष्य जगावं लागतं. इथे ते भविष्यात काय करणार हे त्यांनी ठरवलेलं नसून समाजानं आधीच ठरवून टाकलं आहे.
भारत जोडो भेटीचा संदर्भ देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गांधी म्हणाले, "भारत जोडो यात्रेदरम्यान मला समजले की मी जनतेचा आवाज आहे, लोकांच्या वेदना मी जवळून पहिल्या आहेत. मला इतर कशातही रस नाही. आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. कोणाचेही नुकसान करू नका, सर्वप्रथम भारताचे सामाजिक वास्तव देशासमोर ठेवा. कोणालाही धमकावू नका. दुखवू नका."