Lok Sabha Election : केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर आता प्रेशर पॉलिटिक्स वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यांना लोकसभा अध्यक्षपद मिळावे यासाठी भाजपवर दबाव दोघांकडून आणला जात असल्याची माहिती आहे. या बाबतचे वृत्त हे इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दोन्ही पक्षांनी अध्यक्षपद हे आघाडीतील पक्षाला मिळावे या बाबतचे सकणेत यापूर्वीच भाजप पक्ष श्रेष्ठींना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
१९९० मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आघाडी सरकारचे नेतृत्व करत होते, तेव्हा TDP चे जीएमसी बालयोगी यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची मदार ही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षावर आहे. त्यांना इंडिया आघाडीत घेण्याचे देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे हे पक्ष फुटू नये यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. दरम्यान, हे दोन्ही पक्ष प्रेशर पॉलिटिक्स वापरुन लोकसभा अध्यक्ष पद मिळवण्यासाठी भाजपवर दबाव आणला जात आहे. पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची ठरते. सूत्रांनी सांगितले की, टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही अध्यक्षपदासाठी भाजपच्या इतर काही मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. मात्र, आज बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नायडू आणि नितीशकुमार अधिकृतपणे ही मागणी करणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पक्षांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयालाही मर्यादित अधिकार आहेत. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात सभापतींनी पक्षपाती भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध पक्षांतरविरोधी कारवाईवर सुनावणी घेण्यासाठी आणि त्यांवर निर्णय घेण्याची शेवटची संधी दिली होती. या याचिकांच्या सुनावणीस उशीर झाल्याने पक्षात फूट पडली.
लोकसभेचे संवैधानिक आणि औपचारिक प्रमुख, अध्यक्षपद सामान्यतः सत्ताधारी आघाडीकडे जाते. उपाध्यक्षपद हे परंपरागतपणे विरोधी पक्षाच्या सदस्याकडे असते. मात्र, लोकसभेच्या इतिहासात प्रथमच १७ व्या लोकसभेत उपसभापती निवड करण्यात आली नाही.
संबंधित बातम्या