Amravati Lok Sabha Election 2024 : राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. वादात अडकलेल्या जागांचेही निर्णय होत असून अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. त्यामुळं शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेंसोबत आलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कट झाला आहे.
यापूर्वीच्या भाजप व शिवसेनेच्या युतीमध्ये अमरावतीची लोकसभेची जागा ही शिवसेनेकडं होती. या मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे यापूर्वी शिवसेनेचे खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी अडसूळ यांना पराभवाची धूळ चारली होती. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी प्रचंड गाजली होती.
ईडीचा ससेमिरा मागे लागलेले आनंदराव अडसूळ हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटात गेले होते. लोकसभेच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाकडंच राहील अशी अपेक्षा होती. मात्र, नवनीत राणा यांनी मधल्या काळात भाजपशी जवळीक वाढवली. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरल्यामुळं नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू बनले होते.
लोकसभेचं जागावाटप सुरू होताच साहजिकच नवनीत राणा यांनी या जागेवर दावा केला होता. त्यांना इथून भाजपचं तिकीट मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा या गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या सोबतच आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचं हे वक्तव्य पाहता शिंदे गटानं या जागेवरचा दावा सोडून दिल्याचं दिसत आहे. गेली काही वर्षे राणा दाम्पत्याशी राजकीय संघर्ष करणाऱ्या अडसूळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ हे दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आता अडसूळ पिता-पुत्र राणांच्या बाबतीत उघड विरोधाची भूमिका घेतात की शांत राहून खेळी करतात, याकडं लक्ष लागलं आहे.
अमरावतीच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे. तुल्यबळ उमेदवार दिल्याव व त्याला जुने शिवसैनिक अडसूळ यांची छुपी मदत झाल्यास इथं महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारू शकतो, असाही एक अंदाज आहे.
संबंधित बातम्या