big statement from sharad Pawar: शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील तर काही जवळ येथील असे शरद पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यातील दोन पक्ष लोप पावतील असे वक्तव्य केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी मुलाखतीत दिलेल्या माहितीमुळे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का ? या चर्चांना सुरुवात झाली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी वरील विधान केले आहे. शरद पवार म्हणाले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ येतील. हे पक्ष चांगले समन्वय राखून काम करतील. तर यातील काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन देखील होतील. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकणार नाही, असे पवार म्हणाले.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल का ? या प्रश्नावर देखील शरद पवार यांनी सूचक उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, मला काँग्रेस व राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. माझ्या मते वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे पक्ष आहोत. आमच्यात फारसा फरक नाही. पण, सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा असला तरी आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी सामूहिक पद्धतीने तसेच पक्षातील इतर नेत्यांशी बोलून या बाबत निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे तसेच त्यांचे विचार पटणे हे आमच्यासाठी अवघड आहे, असेही पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. देशातील प्रादेशिक पक्षाबद्दल शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवार म्हणाले, राजद, लोजप, समाजवादी पक्ष, टीडीपी, वायएसआरसीपी, भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत आहे. हा काळ प्रादेशिक पक्षांच्यादृष्टीने स्थित्यंतराचा आहे. या स्थित्यंतरा दरम्यान, अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकत आहेत. काहींवर घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली जाण्याची गरज वाटत आहे. असे झाल्यास त्यांना या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढता येईल.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही मत मांडले आहे. शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरे आणि आमची विचारधारा एकच आहे. आम्ही एकत्र काम करण्यासाठी सकारात्मक आहोत. समविचारी पक्षांसोबत देखील ते काम करण्यासाठी तयार आहेत, असे पवार म्हणाले.