Attack Thackeray Group Raigad District Chief Anil Navgane : रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी मध्यरात्री मोठा राडा या ठिकाणी झाला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर रात्री १.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तिंनी जीवघेणा हल्ला केला आहे. अनिल नवगणे रात्री आपल्या घरी परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शिंदे गटाने हा हल्ला केल्याचा आरोप नवगणे यांनी केला आहे. नवगणे हे इंदापूरला जात होते. यावेळी लोणेर वीर मार्गावर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
रायगड येथील महाड येथे गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा झाली. या सभेत अनिल नवगणे यांनी भरत गोगावले तसेच त्यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका गोगवले यांच्या समर्थकांना जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. महाड येथील सभा आटोपून अनिल नवगणे रात्री घरी परत जात असतांना काही अज्ञात व्यक्तींकडून मुंबई गोवा हायवेवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
नवगणे हे घरी जात अतांना काही लपून बसलेल्या हल्ले खोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनाास्थळी दाखल झाले. या हल्ल्या प्रकरणी अनिल नवगणे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नवगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर रायगडमध्ये वातावरण तापले आहे. येथे तणावपूर्ण स्थिती आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा हल्ला झाल्याने वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.