केंद्रातील एनडीए आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला महायुतीकडून दोन विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्ष हा राज्यात भाजप, शिवसेना-शिंदे गट, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार गटात महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाने चार ते पाच जागा मागितल्या होत्या. जागावाटपात पक्षाला स्थान मिळत नसल्याची नाराजी रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून बोलून दाखवली होती. रिपब्लिकन पक्षाने धारावी, चेंबूर आणि कलिना अशा तीन जागांची मागणी केली होती. परंतु पक्षाला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. आज, सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटपात मुंबई शहरातील धारावी आणि कलिना हे दोन मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आले आहे. निवडणुकीनंतर महायुती राज्यात पुन्हा सत्त्तेत आल्यास रिपब्लिकन पक्षाला विधानपरिषदेत एक सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. मुंबईत वांद्रे येथे आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कलिना विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या कोट्यातून तर धारावीची जागा ही शिवसेनेच्या कोट्यातून सोडण्यात आली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महायुती सत्तेत आल्यास चार महामंडळाचे अध्यक्षपद आणि महामंडळ संचालकाची पदे, जिल्हा व तालुका शासकीय कमिट्यांवरील सदस्यपदे तसेच महापालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, धारावी मतदारसंघातून भारतीय महसूल सेवेचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखडे यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. धारावी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा, उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड या धारावीच्या माजी आमदार आहेत. गायकवाड कुटुंबीय १९८५ पासून धारावी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून वर्षा गायकवाड या चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
संबंधित बातम्या