गुजरातमधीलसूरत आणि मध्य प्रदेश राज्यातील इंदूर मतदारसंघानंतर आता काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. ओडिशा राज्यातील पुरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी पैसे नसल्याचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांनी आपले तिकीट परत केले आहे. ओडिशा राज्यातील पुरी मतदारसंघ (puri lok sabha constituency) हॉटसीट पैकी एक आहे. येथे भाजपचे दिग्गज नेते संबित पात्रा मैदानात आहेत. काँग्रेस उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संबित पात्रा (sambit patra) यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
याआधी सूरत मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश कुंभणी यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. त्यानंतर अन्य पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. तसेच इंदूर लोकसभा सीटचा मुद्दा हायकोर्टात पोहोचला आहे.येथे काँग्रेसने अक्षय बम यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पुरीमध्येही काँग्रेसचा उमेदवार राहिला नाही.
पुरी सीटमधून काँग्रेसचे तिकीट परत करणाऱ्या मोहंती यांनी सांगितले की, त्यांना पक्षाकडून फंड मिळत नाही. त्यामुळे पैशाच्या कमतरतेमुळे निवडणूक लढण्यास सक्षम नाही. सुचारिता यांनी काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहिले होते. त्यांनी म्हटले होते की, पार्टीकडून फंड न मिळाल्याने त्या निवडणुकीचा प्रचारही करू शकत नाही. येथे २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
त्यांनी म्हटले की, विधानसभेतही सात जागांवर जिंकून येण्याची क्षमता नसलेल्यांना उमेदवारी दिली आहे. कमजोर उमेदवारांना तिकीट देत मैदानात उतरवले आहे. त्यांनी म्हटले की, तिकीट परत केल्यानंतही कोणता सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. पक्षाकडून सांगितले गेले की, प्रचारासाठी स्वत:चव्यवस्था करावी लागेल. पार्टी यामध्ये कोणतीही मदत करणार नाही. मोहंती यांनी म्हटले की, मला वाटते की, विधानसभा जागांवर मजबूत उमेदवार असल्यास लोकसभेचा प्रचार करण्यासही सोपे जाईल.
तिकीट लोकशाही मार्गाने मिळाले होते. सामान्यपणे पक्षाकडून उमेदवारांना फंड मिळत असतो. भाजपने इतकी निर्बंध लादले आहेत की, काँग्रेसची आर्थिक स्थिती खूप बिघडली आहे. प्रचाराला पैसा उभा करणे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. काँग्रेस प्रचारही करू शकणार नाही, अशी व्यवस्था भाजपने केली आहे. यामुळे काँग्रेस उमेदवारांना मदत करू शकत नाही.
त्यांनी म्हटले की, आमच्या विरोधकांकडे खूप भांडवल आहे. मी डोनेशनसाठी सोशल मीडियावर मोहीम चालवली होती. मात्र इतक्या कमी वेळात पैसा जमा करणे शक्य नाही. मी लोकांच्या माध्यमातूनही कॅम्पेन चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठीही पैसा आवश्यक असतो. आता वेळही खूप कमी राहिल्याने मी तिकीट परत करण्याचा निर्णय घेतला.