Jagan Mohan Reddy: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी हे प्रचार रॅलीत असताना, गर्दीतून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड भिरकवल्याने तो त्यांच्या डोक्याला लागला असून या हल्यात त्यांचा डोळा थोडक्यात वाचला आहे. त्यांच्या डोक्याला खोच पडली असून दोन टाके देखील पडले आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी बसमध्ये बसून प्रचार करत होते. हा दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या भुवया वर थोडासा वर लागल्याने यात त्यांचा डोळा हा थोडक्यात वाचला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रचार करत असतांना, जवळच्या शाळेतून दगडफेक करण्यात आली. YSRCP सदस्य म्हणाले, "हा हल्ला टीडीपी आघाडीचा कट आहे. (टीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री) चंद्राबाबू नायडू यांची अस्वस्थता या हल्यातुन दिसून येते."
मुख्यमंत्री विजयवाडा येथील सिंह नगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरमध्ये जमावाला संबोधित करत असताना अचानक दगडफेक झाली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अत्यंत वेगाने दगड रेड्डी यांच्यावर कपाळाला लागला. तो गोफणीतून सोडण्यात आला असावा, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांना आहे. बसच्या वरच्या भागातून मुख्यमंत्री नागरिकांना अभिवादन करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.
जगन मोहन रेड्डी हे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मेमंथा सिद्धम (आम्ही सर्व तयार आहोत) बस प्रवास सुरू केला होता. २१ दिवसांपासून ते या बसने प्रचार यात्रा करणार आहे. राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका या वर्षी होणार आहेत. भाजपने तेलगू देसम (टीडीपी) आणि जनसेना पक्षासोबत युती केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आंध्रप्रदेशात तणावाचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या