Highest Test Partnership for Afghanistan : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे.
अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानचे फलंदाज रहमत शाह आणि हसमतुल्ला शाहिदी यांनी चमकदार कामगिरी करत त्यांच्या संघासाठी विक्रमी भागीदारी नोंदवली.
तिसऱ्या दिवसाचा (२८ डिसेंबर) खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने २ गडी गमावून ४२५ धावा केल्या होत्या. रहमत शाह ४१६ चेंडूत २३१ आणि शाहिदीने २७६ चेंडूत १४१ धावांवर नाबाद होते. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६१ धावांची भागीदारी केली, जी अफगाणिस्तानची कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. सोबतच झिम्बाब्वेच्या भूमीवर कसोटी इतिहासातील दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे.
यादरम्यान रहमत शाह अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शाहिदीच्या नावावर होता.
आतापर्यंत या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५८६ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेसाठी शॉन विल्यम्सने १७४ चेंडूत १५४ धावा, कर्णधार क्रेग एर्विनने १७६ चेंडूत १०४ धावा केल्या आणि ब्रायन बेनेटने १२४ चेंडूत नाबाद ११० धावा केल्या. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.
प्रत्युत्तरात अफगाण फलंदाजांनीही दमदार खेळ दाखवला. त्यांनी संपूर्ण तिसऱ्या दिवसात एकही विकेट पडू दिली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम इंग्लंडच्या जॅक हॉब्स आणि हर्बर्ट सटलिफ यांनी ९८ वर्षांपूर्वी केला होता. झिम्बाब्वेचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ दिसत होते.
त्यांच्याकडून ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, मात्र १२५ षटके टाकूनही ते अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत.
संबंधित बातम्या