हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने मोठा उलटफेर करत भारताचा टी-२० विश्वचषक विजयाचा जल्लोष थांबवला. बार्बाडोस येथे झालेल्या टी-२० विश्वचषक विजयानंतर बरोबर आठवडाभरानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरू न शकलेल्या झिम्बाब्वेने घरच्या प्रेक्षकांसमोर चॅम्पियन्सना गुडघ्यावर आणले.
विश्वचषक विजेत्या संघातील एकही सदस्य संघात नसलेल्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाला नवीन कर्णधार सिकंदर रझाच्या नेतृत्वात झिम्बाब्वेविरुद्ध १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. सलग १२ सामने अपराजित राहिल्यानंतर भारताचा यंदाचा हा पहिलाच पराभव ठरला. झिम्बाब्वेकडून भारताला तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. आठ वर्षांपूर्वी याच मैदानावर त्यांचा शेवटचा पराभव झाला होता.
विजयासाठी ११६ धावांचा पाठलाग करताना भारताने १९.५ षटकांत ९ बाद १०२ धावा केल्या. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्याशिवाय युवा फलंदाजांना सामन्याच्या सरावाची कमतरता भासत होती. केवळ कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांनी काहीसा प्रतिकार केला. तर उर्वरित नऊ पिन्सप्रमाणे बाद झाले.
या सामन्यात पदार्पण करणारा अभिषेक शर्मा ४ चेंडूत बाद झाला. सलग तीन डॉट बॉलचा सामना केल्यानंतर अभिषेकने ऑफ स्पिनर ब्रायन बेनेटच्या चेंडूला षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तो झेलबाद झाला.
ऋतुराज गायकवाडही या सामन्यात अपयशी ठरला. रियान पराग (२) हा आणखी एक नवोदित खेळाडू स्वस्तात माघारी परतला. भारताच्या विश्वचषक मोहीमेत राखीव खेळाडूंपैकी एक असलेल्या रिंकू सिंगने त्याच षटकात आणखी एक बेफिकीर शॉट खेळत दोन चेंडूत माघारी परतला. भारताची अवस्था ५ षटकांत ४ बाद २२ अशी केविलवाणी झाली होती.
कर्णधार गिल आणि ध्रुव जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर ध्रुव माघारी परतला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने पुढच्याच षटकात शुभमन गिलला फ्लोटेड इन-स्विंगरने फसवले. गिल ३१ धावांवर बाद झाला. भारताला अजूनही विजयासाठी ५५ धावांची गरज होती.
त्यानंतर आवेश खान (१६) आणि वॉशिंग्टन सुंदर (२७) यांनी आठव्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी करत भारताला ८४ धावांपर्यंत नेले. अखेरच्या षटकात भारताला १६ धावांची गरज होती आणि वॉशिंग्टन असूनही त्यांना केवळ दोन धावा करता आल्याने झिम्बाब्वेने १३ धावांनी सामना जिंकला.
झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर तेंदई चतारा (२), ब्रायन बेनेट, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे आणि ब्लेसिंग मुजारबानी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
यापूर्वी रवी बिश्नोई (४/१३) याला ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (२/११) यांनी पुरेशी साथ दिल्याने झिम्बाब्वेला कमी धावसंख्येत रोखता आले. मात्र, झिम्बाब्वेने आपल्या डावाची दमदार सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये दोन बाद ४० धावांपर्यंत मजल मारली.
संबंधित बातम्या