भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे युझीने आपल्या गोलंदाजीने नाही तर फलंदाजीने मोठी कामगिरी केली आहे. युझवेंद्र चहलने रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणासाठी दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली.
चहलने उत्तर प्रदेशविरुद्ध १५२ चेंडूंचा सामना करताना ४८ धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युझवेंद्र चहलने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. या खेळीत चहलने ६ चौकारही मारले.
मात्र, गोलंदाजीत युझी चहल विशेष काही करून शकला नाही. चहलने गोलंदाजीत हरियाणासाठी आतापर्यंत एकूण ११ षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने ५७ धावा दिल्या आहेत, मात्र त्याला एकही विकेट मिळालेली नाही. अर्थात चहलला गोलंदाजीत आपल्या संघासाठी कामगिरी करता आली नाही, पण फलंदाजीत मात्र त्याने कमाल केली.
चहलच्या ४८ धावांच्या योगदानामुळे हरियाणा संघाने ४५३ धावा केल्या. यामुळेच हरियाणाच्या संघाने यूपीवर भक्कम आघाडी मिळवली आहे.
हरियाणाविरुद्ध फलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसत आहे. हरियाणाच्या ४५३ धावांच्या प्रत्युत्तरात यूपीने ६ गडी गमावून २६७ धावा केल्या आहेत. यूपीकडून सलामीवीर फलंदाज आर्यन जुयाल नाबाद ११८ धावा करत खेळत आहे. आर्यनशिवाय रिंकू सिंगनेही तुफानी शैलीत फलंदाजी करत ८९ धावांची स्फोटक खेळी खेळली. रिंकू सिंगने ११० चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ३ षटकार मारले.
आर्यन आणि रिंकू व्यतिरिक्त आतापर्यंत एकही फलंदाज यूपी संघासाठी काही खास करू शकला नाही. यामुळेच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तरी यूपीचा संघ अजूनही हरियाणाच्या १८६ धावांनी पिछाडीवर आहे.
संबंधित बातम्या