Yuvraj singh : आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरूनही हार्दिक पंड्या याची टी-२० वर्ल्डकपमध्ये निवड; युवराज सिंग म्हणतो…
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yuvraj singh : आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरूनही हार्दिक पंड्या याची टी-२० वर्ल्डकपमध्ये निवड; युवराज सिंग म्हणतो…

Yuvraj singh : आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरूनही हार्दिक पंड्या याची टी-२० वर्ल्डकपमध्ये निवड; युवराज सिंग म्हणतो…

May 22, 2024 02:40 PM IST

Yuvraj singh praises rohit sharma : आयपीएलमध्ये फॉर्मात नसतानाही हार्दिक पंड्या याची टी-२० विश्वचषक संघात निवड झाल्याबद्दल युवराज सिंग यानं आनंद व्यक्त केला आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये हार्दिक पंड्या गेमचेंजर ठरेल; युवराज सिंहला असं का वाटतं?
टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये हार्दिक पंड्या गेमचेंजर ठरेल; युवराज सिंहला असं का वाटतं? (AFP)

Yuvraj singh praises rohit sharma : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी आल्यापासून हार्दिक पंड्या याच्यावर टीकेची झोड उठली आहे. भारतीय संघातील भरवशाचा खेळाडू असलेला हार्दिक सध्या गोलंदाजी आणि फलंदाजीतही चाचपडत आहे. त्यामुळं टी-२० विश्वचषक संघातील त्याच्या निवडीवरही संशय निर्माण झाला होता. मात्र, त्याची निवड झाली आहे. युवराज सिंग यानं या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना हार्दिक पंड्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

'आयपीएलमध्ये चाचपडत असतानाही पंड्याला भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळाल्याचा आनंद आहे. बीसीसीआयची निवड समिती खेळाडूची निवड करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण कामगिरी बघते. केवळ आयपीएलमधील फॉर्मवरून निर्णय घेत नाही. केवळ आयपीएल फॉर्म पाहिला तर हार्दिकनं चांगली कामगिरी केलेली नाही. त्यानं भारतीय संघासाठी काय केलं हे पाहिलं तर तो संघात असणे महत्त्वाचं आहे. त्याची गोलंदाजी महत्वाची असेल आणि त्याचा फिटनेस महत्वाचा असेल. टी-ट्वेंटी विश्वचषकात तो काहीतरी विशेष कामगिरी करेल, असा विश्वास युवराज सिंग यानं व्यक्त केला.

शिवम दुबेच्या निवडीचंही युवराजनं केलं कौतुक

शिवम दुबेच्या टी-२० विश्वचषक संघातील निवडीमुळं देखील युवराज सिंग खूश झाला आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामात हा अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्यानं १४ सामन्यांत ३६ च्या सरासरीनं आणि १६२ च्या स्ट्राईक रेटनं ३९६ धावा केल्या होत्या.

दुबेच्या भारतीय संघातील समावेशाबद्दल बोलताना युवराज म्हणाला की, 'शिवम दुबेनं भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्येही त्यानं सातत्य राखलं आहे. त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो संघात असणं महत्त्वाचं होतं, असं मला वाटतं. मधल्या फळीत किंवा खालच्या फळीत तो खूप मोठा बदल घडवून आणू शकतो, त्यामुळं त्याला भारतीय टी-२० संघात पाहून आनंद होत आहे,' असं युवराज सिंग यानं म्हटलं आहे.

कधी सुरू होणार टी-ट्वेंटी विश्वचषक?

आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यानंतर काही दिवसांतच टी-२० षटकांच्या विश्वचषकाला अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सलामीच्या सामन्यानं सुरुवात होणार आहे. टी-२० विश्वचषक ट्रॉफीचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.

Whats_app_banner