मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एका ओव्हरमध्ये ६ षटकार; आजच्या दिवशी १६ वर्षांपूर्वी डरबनमध्ये घोंगावलं होतं 'युवराज' नावाचं वादळ

एका ओव्हरमध्ये ६ षटकार; आजच्या दिवशी १६ वर्षांपूर्वी डरबनमध्ये घोंगावलं होतं 'युवराज' नावाचं वादळ

Sep 19, 2023 12:19 PM IST

Yuvraj Singh Smashed 6 Sixes In An Over: भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंहनं आजच्या दिवशी १६ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर एकाच षटकार सहा षटकार ठोकले होते.

Yuvraj Singh
Yuvraj Singh

Yuvraj Singh Record Breaking innings: माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं २००७ मध्ये इतिहास रचला. पहिल्यांदाचं खेळला गेलेल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरून भारतानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. भारताच्या यशात स्टार फलंदाज युवराज सिंहचा मोलाचा वाटा होता. टी-२० विश्वचषकात भल्याभल्या गोलंदाजांनी युवराज सिंहसमोर गुडघे टेकले. या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सामन्यात युवराज सिंहचा रौद्र अवतार पाहायला मिळाला, ज्यात युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार ठोकून क्रिकेटविश्वात त्याची दहशत निर्माण केली. युवराज सिंहच्या या खास विक्रमाला आज १६ वर्ष पूर्ण झाली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

क्रिकेटविश्वातील आक्रमक खेळाडूंच्या यादीत युवराज सिंहची गणना केली जाते. युवराजनं त्याच्या कारकिर्दीत अनेक वादळी खेळी केल्या. २००७ च्या विश्वचषकात एकाच षटकात ६ षटकार ठोकण्याची कामगिरी त्यापैकी एक आहे. या स्पर्धेत भारत आणि इंग्लंड आजच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या डरबन येथे आमने-सामने आले. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताने १७ षटकात ३ विकेट्स गमावून १५५ धावा केल्या. मात्र, आठराव्या षटकात इंग्लंडकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफनं युवराज सिंहशी वाद घालून आगीत हात घातला. यानंतर संतापलेल्या युवराजने त्याचा सगळा राग १९व्या षटकात काढला.

इंग्लंडच्या संघानं भारताच्या डावातील १९व्या षटकात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडकडे चेंडू सोपावला. हे षटक स्टुअर्ट ब्रॉड कधीच विसरू शकणार नाही. या षटकात युवराज सिंहनं ६ षटकार ठोकून विश्वविक्रमाला गवसणी घातली. याच सामन्यात युवराज सिंहनं अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.

दरम्यान, २००० मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या युवराज सिंहनं ११ जून २०१९ निवृत्तीची घोषणा केली. युवराजनं आपल्या कारकिर्दीत अनेक खास विक्रमाला गवसणी घातली. युवराज सिंह हा अंडर-१९ वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी, आशिया कप, एकदिवसीय वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, टी-१० आणि आयपीएलचा खिताब जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. त्यानं एकट्याच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले. त्यामुळं त्याला भारतीय क्रिकेट संघाचा मॅच विनर म्हणून ओळखलं जात होतं.

२००७ चा टी-२० आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंहनं दमदार कामगिरी केली. यानंतर कॅन्सरमुळं युवराजला बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. मात्र, कॅन्सरशी लढा जिंकून त्यानं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आणि अनेकांसाठी तो आदर्श ठरला. त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जून २०१७ मध्ये खेळला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४