टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, एका मुलाखतीत, सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या भविष्याबद्दल योगराज सिंग यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उत्तर देताना त्यांनी असे काही वक्तव्य केले,की ते पुन्हा चर्चेत आले आहे.
योगराज सिंग यांचे उत्तर वेगाने व्हायरल झाले, ज्यामध्ये त्यांनी अर्जुन तेंडुलकरचे वर्णन कोळसा असे केले आणि पुढे सांगितले की जर तो चांगल्या हाताखाली राहिला तर तो कोहिनूर बनू शकतो.
योगराज सिंह म्हणाले, "तुम्ही कोळशाच्या खाणीत हिरा पाहिला आहे का? तो फक्त कोळसा आहे... तो फक्त एक दगड आहे. तो एखाद्या चांगल्या नक्षीदाराच्या हातात दिला तर तो जगाचा कोहिनूर बनतो. पण जर तोच हिरा जर त्याची किंमत नसलेल्या माणसाच्या हातात पडला तर तो त्याचा नाश करतो."
त्यांचे हे विधान क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनले आहे. अर्जुन तेंडुलकरमध्ये टॅलेंट आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि मेहनतची जोड हवी आहे, असेही योगराज सिंह म्हणाले.
यासोबतच त्यांनी युवराज सिंगच्या कारकिर्दीची आठवण करून दिली आणि आपल्या मुलाला महान क्रिकेटर बनण्यास कशी मदत केली हे सांगितले.
योगराज म्हणाले, “युवराजने एकेकाळी माझा तिरस्कार केला होता. घरी मला हिटलर, ड्रॅगन सिंग अशा नावांनी हाक मारली जात होती. माझ्या नातेवाईकांनीही माझ्यापासून अंतर ठेवले होते आणि म्हणायचे, की मी बाप बनायला नको होते, पण आज तेच लोक माझी स्तुती करतात. कारण युवराज. तो स्वतः म्हणाला होता की माझ्या वडिलांच्या हातात जादू आहे त्यांनी मला घडवले.”
याशिवाय योगराज सिंग यांनी मुलाखतीदरम्यान महेंद्रसिंह धोनी याच्या वरही निशाणा साधला. ते म्हणाले, की “मी धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने माझ्या मुलाशी जे केले ते आता समोर आले आहे. तो एक महान क्रिकेटर असेल, पण त्याने माझ्या मुलाशी जे केले ते माझ्या आयुष्यात कधीही माफ होऊ शकत नाही.”
आता योगराज सिंग यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण धोनी आणि युवराज सिंग एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचे महत्त्वाचे सदस्य होते आणि एक दशकाहून अधिक काळ एकत्र खेळले होते.