भारतीय क्रिकेट संघाने २००७ मध्ये टी-20 विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगने दोन्ही स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंगला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आले. या स्पर्धेदरम्यान युवराज सिंग केवळ विरोधी संघाशीच नाही तर स्वत:शीही लढत होता.
युवराज कर्करोगाशी झुंज देत होता. एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर युवराज सिंगने कॅन्सरशी लढा दिला आणि त्यात विजय मिळवला. युवराजच्या संघर्षाची ही कहाणी आता मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. युवराजच्या बायोपिकची निर्मिती टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आणि रवी भागचंदका करणार आहेत.
युवराजच्या बायोपिकचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, या बायोपिकमध्ये युवराज सिंगच्या प्रेमकहाणीपासून त्याच्या संघर्षापर्यंत ५ पैलू दाखवले जाऊ शकतात. हे ५ पैलू नेमके कोणते असू शकतात, ते जाणून घेऊया.
माजी क्रिकेटर आणि युवराज सिंगचे वडील योगीराज सिंग यांनी पहिले लग्न शबनम सिंगशी केले. युवराज सिंग लहान असताना योगीराज यांनी शबनमला घटस्फोट दिला होता. यानंतर युवराजच्या वडिलांनी पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेलशी लग्न केले. युवराजला क्रिकेटर बनवण्यात त्याच्या वडिलांचा मोठा हात आहे. युवराज सिंग त्याच्या आईसोबत राहतो. अशा परिस्थितीत त्याचे वडिलांसोबतचे नाते चित्रपटात कसे दाखवले जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
युवराज सिंगची सुरुवातीची कारकीर्द खूपच स्टायलिश होती. तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. युवराज सिंग हे देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव होते. ३ ऑक्टोबर २००० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकले. एवढेच नाही तर त्याने १२ चेंडूत अर्धशतक झळकावले. युवराजचे ६ षटकार चित्रपटात नक्कीच पाहायला मिळतील.
युवराज सिंगने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्याने ९ सामन्यांच्या ८ डावात ३६२ धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने ९ सामन्यात १५ बळी घेतले. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला. युवराजने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते.
यावेळी युवीला मैदानात रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. यानंतर त्यांने कॅन्सरशी लढा दिला आणि उपचारासाठी ते परदेशात गेला. कर्करोगाशी लढा जिंकल्यानंतर युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन केले.
युवराज सिंगने बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचची जीवनसाथी म्हणून निवड केली. मात्र, हेजल कीचसोबतचे लग्न त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. हेजलसोबत डेटवर जाण्यासाठी युवीला जवळपास ३ वर्षे वाट पाहावी लागली. मात्र, नंतर दोघांची भेट होऊ लागली. युवराजने हेजलला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने होकार दिला. यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले.