Lok Sabha Elections Result 2024, Yusuf Pathan : भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे. पठाणनने कॉंग्रेसचे नेते दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. युसूफने तृणमूल काँग्रेसकडून (TMC) बेहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ५९ हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भारतीय जनता पक्षाचे डॉ. निर्मलकुमार साहा तिसऱ्या स्थानावर राहिले. अधीर रंजन १९९९ पासून बहरामपूर मतदारसंघातून खासदार होते, मात्र यावेळी युसूफ पठाण बहरामपूरमधून विजयी झाले आहेत. युसूफ पठाण यांना ४,२३,४५१ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना ३,५९,३६७ लोकांनी मतदान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे निर्मल कुमार यांना ३,२३,६८५ मते मिळाली.
विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना युसूफ पठाण म्हणाले, "माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सर्वांचे मला अभिनंदन करायचे आहे. मला खूप आनंद झाला आहे. हा माझा विजय नसून सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. विक्रम फक्त मोडण्यासाठीच बनतात. आणि मी अधीर रंजनजींचा खूप आदर करतो आणि भविष्यातही त्यांचा आदर करत राहीन.'
मतमोजणी सुरू झाली तेव्हा युसूफ पठाण सुरुवातीच्या तासांमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसतशी युसूफने वेग घेतला आणि गेले अनेक तास तो पहिल्या स्थानावर राहिला. पठाण यांचा हा विजय आश्चर्यकारक आहे कारण अधीर रंजन चौधरी हे ५ वेळा खासदार राहिले आहेत.
युसूफ पठाणच्या आधीही अनेक भारतीय क्रिकेटपटू निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू, गौतम गंभीर, कीर्ती आझाद, मोहम्मद अझरुद्दीन आणि चेतन चौहान यांनीही लोकसभा निवडणूक जिंकली आहे आणि संसदेचा भाग बनले आहेत. आता या यादीत युसूफ पठाणचेही नाव जोडले गेले आहे. खासदार बनताच युसूफ यांनी सर्वप्रथम खेळाडूंसाठी क्रीडा अकादमी बांधण्याचे आश्वासन दिले आहे.
युसूफ पठाणने आपल्या वनडे कारकिर्दीत ४१ एकदिवसीय डावात एकूण ८१० धावा केल्या. या ४१ डावांमध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. युसूफ पठाणने भारतासाठी १८ टी-20 डावात एकूण २३६ धावा केल्या. गोलंदाजीत युसूफने एकदिवसीय सामन्यात ३३ आणि टी-20 सामन्यात १३ विकेट्स घेतल्या.