Indian Batter Copy Steve Smith Batting Style : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ त्याच्या विचित्र फलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. तो नेहमी क्रीझवर पुढे मागे सरकत गोलंदाजांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतो. स्मिथची ही रणनीती त्याच्यासाठी अनेकदा कामी आली आहे.
आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक युवा भारतीय खेळाडू स्मिथच्या शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे. स्मिथची स्टाईल कॉपी करणं खूप कठीण आहे, पण या युवा भारतीय खेळाडच्या स्टाइलनं इंटरनेटवर चांगलीच चर्चा मिळवली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या रिचर्ड केटलबरो यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथप्रमाणेच हा युवा फलंदाज चेंडू खेळल्यानंतर नो रन म्हणत बॅट गोलंदाजांना दाखवत असल्याचे दिसत आहे.
यानंतर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू सोडण्याच्या स्टाइलचीही कॉपी केली. त्याची फलंदाजीही स्टीव्ह स्मिथसारखीच दिसत आहे. यावरून हे समजू शकते की भारतात फक्त विराट कोहली आणि रोहित शर्माच नाही तर स्टीव्ह स्मिथचेही चाहते आहेत.
भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी, स्टीव्ह स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९६८५ धावा केल्या होत्या आणि १०००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला ३१५ धावा करायच्या होत्या. भारताविरुद्धच्या मालिकेअखेर त्याने ५ सामन्यात २ शतकी खेळीसह ३१४ धावा केल्या.
म्हणजेच स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त एक धाव दूर आहे. कसोटी सामन्यात १० हजार धावा करणारा तो जगातील १५वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू बनणार आहे. त्याची कसोटी सरासरी ५५.८६ आहे आणि आत्तापर्यंत ३४ शतकांव्यतिरिक्त त्याने ४१ अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या आहेत.