Sarfaraz Khan and Musheer Khan Video Call : भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीत सरफराज खानने धमाकेदार पदार्पण केले. पदार्पणातच सरफराजने अर्धशतक झळकावताना ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला या खेळीचे शतकात रूपांतर करता आले नाही. सरफराज रवींद्र जडेजाने चुकीच्या कॉलवर धावबाद झाला.
राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर सरफराज खानने त्याचा भाऊ मुशीरसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. फोनवर बोलताना सरफराजने मुशीरला त्याच्या खेळाबद्दल विचारले.
यावर मुशीरने सांगितले की, तो खूप चांगला खेळला, पण जेव्हा त्याने जो रूटविरुद्ध स्वीप शॉट खेळला आणि चेंडू हवेत गेला तेव्हा तो घाबरला होता. यावर सरफराज म्हणाला की, क्षेत्ररक्षक पुढे असल्याचे त्याने पाहिले होते, त्यामुळेच त्याने असा हवेत स्वीप शॉट मारला.
यानंतर सरफराज मुशीरला म्हणाला, 'एक दिवस तूही इथे येशील आणि खेळशील... ही टेस्ट कॅप बघ.' यावर मुशीर म्हणाला, 'तू खूप छान खेळलास भाई, मला पाहताना मजा आली.'
विशेष म्हणजे, मुशीर खानदेखील नुकताच टीम इंडियाकडून अंडर १९ वर्ल्डकप खेळून आला आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये २ शतकं ठोकली होती. त्याच्या भावाप्रमाणेच मुशीरही त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. मुशीर आणि सरफराज दोघेही त्यांच्या वडिलांकडून प्रशिक्षण घेतात.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रविंद्र जडेजा ९९ धावांवर फलंदाजी करत होता. त्याला शतकासाठी एक धाव हवी होती. पण ही एक धाव पूर्ण करण्याच्या नादात सरफराज खान धावबाद झाला.
डावाच्या ८२व्या षटकात जेम्स अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सरफराजला सिंगलसाठी बोलावलं, सरफराज रनसाठी धावला पण जडेजाने नंतर सरफराजला सिंगलसाठी नकार दिला. सरफराज बराच पुढे आला होता, अशा स्थितीत तो परत क्रीजपर्यंत पोहचू शकला नाही. मार्क वूडने थेट स्टंपवर थ्रो मारून सरफराजला धावबाद केले.
सरफराज धावबाद झाल्यानंतर जडेजाने शतक पूर्ण केलं. पण सरफराजला पदार्पणाच्या सामन्यात शतक करण्याची संधी होती, ती हुकली.
संबंधित बातम्या