भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान कर्करोगाशी झुंज देत होता. असे असतानाही त्याने भारताला वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी यावर भाष्य केले आहे.
कॅन्सरशी झुंज देणारा युवराज विश्वचषकादरम्यान मृत्यूमुखी पडला असता तर मला अधिक अभिमान वाटला असता, असे ते म्हणाले आहेत.
समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले, युवराज सिंग जर आपल्या देशासाठी कॅन्सरने मरण पावला असता आणि भारताने विश्वचषक जिंकला असता तर मला अभिमान वाटला असता. मला आजही त्याचा खूप अभिमान आहे. हे मी त्याला फोनवरही सांगितले आहे.
तोंडातून रक्त येत असतानाही त्याने खेळावे अशी माझी इच्छा होती. मी त्याला म्हणालो, 'काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस.' भारतासाठी हा विश्वचषक जिंकून दे.'
एकदिवसीय विश्वचषक २०११ दरम्यान, युवराज कॅन्सरशी झुंज देत होता. पण अशा स्थितीतही तो खेळत राहिला आणि २८ वर्षांनंतर भारताला वर्ल्डकप जिंकून दिला.
याआधी, तो २००७ मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. असे असूनही योगराज सिंग आपल्या मुलावर खूश नाहीत. युवी आणखी चांगला क्रिकेटपटू होऊ शकला असता, असे त्यांचे मत आहे.
युवराज सिंगने वडिलांप्रमाणे १० टक्केही मेहनत घेतली असती तर तो एक महान क्रिकेटर बनला असता, असे योगराज म्हणाले.
एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये युवराज सिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. या वर्ल्डकपमध्ये, युवीने ८ डावांमध्ये ९०.५ च्या सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राइक रेटने ३६२ धावा केल्या होत्या. त्याने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती. सोबतच युवराजने १५ विकेट्स घेतल्या. तो टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा चौथा खेळाडू होता. या संपूर्ण स्पर्धेत त्याने ४ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला.
संबंधित बातम्या