भारतीय देशांतर्गत क्रिेकेटमध्ये एक मोठा पराक्रम घडला आहे. हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात एका फलंदाजाने एक खास विक्रम केला आहे. हरियाणाचा दमदार खेळाडू यशवर्धन दलाल याने इतिहास रचला आहे. २३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीच्या सामन्यात यशर्वधन दलालने एकट्याने ४०० हून अधिक धावा केल्या. त्याने ४६ चौकार आणि १२ षटकार मारले. या खेळीमुळे यशवर्धन चांगलाच चर्चेत आला आहे.
अंडर २३ सीके नायडू ट्रॉफीत हरियाणा आणि मुंबई यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हरियाणाने ८ विकेट गमावून ७३२ धावा केल्या होत्या. यावेळी यशवर्धन संघाची सलामीला आला होता. दुसऱ्या दिवसापर्यंत त्याने ४६३ चेंडूंचा सामना करत नाबाद ४२६ धावा केल्या. त्याच्या खेळीत ४६ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. यशवर्धनचा स्ट्राइक रेट ९२.०१ होता.
अर्श हा यशवर्धनसोबत हरियाणासाठी सलामीला आला होता. त्याने ३११ चेंडूंचा सामना करत १५१ धावा केल्या. अर्शच्या या खेळीत १८ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. यादरम्यान दोघांमध्ये ४१० धावांची भागीदारी झाली. अर्शने या भागीदारीत १५१ धावांचे योगदान दिले. तर यशवर्धनने २४३ धावांचे योगदान दिले.
हरियाणामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी ८ विकेट्स गमावून ७३२ धावा केल्या होत्या. यावेळी अर्श आणि यशवर्धन यांच्यासह सहकारी खेळाडूंनीही हातभार लावला. कर्णधार सर्वेश रोहिल्लाने ५९ चेंडूंचा सामना करत ४८ धावा केल्या.
पर्थ वत्स २४ धावा करून बाद झाला. पर्थ नागिलने ५ धावा केल्या. मुंबईकडून अथर्व भोसलेने ५ विकेट घेतल्या. त्याने ५८ षटकात १३५ धावा दिल्या.