चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने बागलादेशला ५१४ धावांचे विशाल लक्ष्य दिले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपला दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि ऋषभ पंतने शानदार शतकं ठोकली.
दरम्यान, भारताच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. पण टीम इंडियाचा युवा स्टार यशस्वी जैस्वालने जबरदस्त कॅच घेत बांगलादेशच्या डावाला सुरूंग लावला.
यशस्वीला या सामन्यापासून दूर ठेवणे कठीण आहे कारण दुसऱ्या डावात त्याची बॅट चालली नाही, पण त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने चमत्कार केला आहे.
यशस्वीने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतासाठी धोक्याची ठरणारी बांगलादेशची सलामी जोडी फोडली. झाकीर हसन आणि शादमान इस्लाम या जोडीने स्वत:ला सेट केले होते आणि ते सहज धावा काढत होते.
टीम इंडियाला विकेटची नितांत गरज होती आणि यशस्वीने अप्रतिम झेल घेत भारताला हे यश मिळवून दिले.
भारताने बांगलादेशला मोठे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना झाकीर आणि शादमान यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज सेट दिसत होते आणि भारताला पहिली विकेट घेण्यात अडचण येत होती.
पण १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने झाकीर हसनला चकवले आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन गलीमध्ये गेला. यशस्वी गलीमध्ये उभा होता. मात्र, चेंडू यशस्वीच्या डावीकडे होता आणि खूप खाली होता.
पण तेवढ्यात जैस्वालने डावीकडे वळून चेंडू मेदानावर पडण्यापूर्वी हातात घेतला आणि झाकीरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यशस्वीचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. संपूर्ण टीमने यशस्वीला मिठी मारली. झाकीरने ४७ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा केल्या.
दुसऱ्या डावात १० धावा करून यशस्वी बाद झाला, पण त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. पहिल्या डावात यशस्वीच्या बॅटमधून ५२ धावा झाल्या. या धावा अतिशय महत्त्वाच्या वेळी आल्या. कारण भारताने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे फलंदाज गमावले होते. अशा कठीण प्रसंगी यशस्वीने विकेटवर पाय रोवत शानदार अर्धशतकी खेळी खेळली.