ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) भारतीय संघाने ५१ धावांत दोन विकेट गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला तर केएल राहुल सेट झाल्यानंतर टी ब्रेकपूर्वी पॅव्हेलियनमध्ये परतला.
दोन विकेट लकर पडल्यानंतर विराट कोहलीसह यशस्वी जैस्वालने डावाची धुरा सांभाळली. यशस्वीने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याला कोणताही गोलंदाज अडचणीत आणू शकला नाही.
यशस्वी जैस्वाल सहजरीतीने शतकाकडे वाटचाल करत होता. त्याचा स्ट्राईक रेट ७० होता. पण अशातच एक दुर्वेवी घटना घडली. विराट कोहली आणि यशस्वी यांच्यातील समन्वय बिघडला. त्याचा परिणाम यशस्वी धावबाद झाला.
यशस्वीने ४१व्या षटकातील शेवटचा चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळला आणि धावा घेण्यासाठी धावला. पण विराट बॉलकडे पाहत राहिला. तो क्रीजमध्येच उभा राहिला आणि यशस्वी वेगात दुसऱ्या एंडपर्यंत पोहोचला.
मिडऑनला कर्णधार पॅट कमिन्सने चेंडू उचलला आणि विकेटकीपरच्या दिशेने फेकला. यानंतर ॲलेक्स कॅरीने बेल्स उडवले. यावेळी विराट आणि यशस्वी एकमेकांकडे बघत राहिले. यशस्वीने ११८ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकारासह ८२ धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल धावबाद झाल्यानंतर विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. यशस्वी संघाच्या १५३ धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यात केवळ एक धावांची भर पडताच विराटही बाद झाला. स्कॉट बोलंडच्या ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर विराटने यष्टिरक्षकाकडे झेल दिला.
त्याने ३६ धावांची खेळी खेळली. दिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा होती. रवींद्र जडेजासोबत यष्टीरक्षक ऋषभ पंत क्रीझवर होता.
संबंधित बातम्या