भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ चा दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जात असलेल्या या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अशा स्थितीत युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल भारतीय डावाचा पहिला चेंडू खेळायला आला होता. तर ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टाकले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर स्टार्कने यशस्वी जैस्वालला बाद केले.
जैस्वाल एलबीडब्ल्यू आऊट झाला. स्टार्कने जैस्वालला फुल लेंथ चेंडू टाकला होता, जो यशस्वीला समजू शकला नाही आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला.
पर्थ कसोटीतील शतकवीर जैस्वालला ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
वास्तविक, पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि मिचेल स्टार्क यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यशस्वी जैस्वालने फलंदाजी करताना स्टार्कला टोमणे मारले होते.
चेंडू खूप स्लो येतोय, असे जैस्वाल स्टार्कला म्हणाला होता. पण आता ॲडलेड कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर त्याला बाद करून स्टार्कने त्याचा बदला घेतला आहे.
ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. कर्णधार रोहित शर्माशिवाय शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनीही टीम इंडियात पुनरागमन केले आहे. या खेळाडूंनी देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान दिले आहे.