Yashasvi Jaiswal : २२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल नंबर वन, दिग्गज केन विल्यमसनला मागे टाकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal : २२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल नंबर वन, दिग्गज केन विल्यमसनला मागे टाकलं

Yashasvi Jaiswal : २२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल नंबर वन, दिग्गज केन विल्यमसनला मागे टाकलं

Feb 17, 2024 09:03 PM IST

yashasvi jaiswal in test cricket : यशस्वी जैस्वालमुळेच टीम इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची एकूण आघाडी आता ३२२ धावांची झाली आहे.

yashasvi jaiswal in test cricket
yashasvi jaiswal in test cricket (ANI )

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे. तर त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक आहे. यशस्वीने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आणि भारताच्या दुसऱ्या डावात १०४ धावांची खेळी केली.

यशस्वी जैस्वालमुळेच टीम इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची एकूण आघाडी आता ३२२ धावांची झाली आहे.  भारतीय संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर २ बाद  १९६ धावा केल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात शतक झळकावल्यानंतर जैस्वालने केन विल्यमसनला एका खास बाबीत मागे टाकले आहे. 

२०२४ या वर्षात सर्वाधिक धावा

यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात १०४ धावा केल्या. त्याने अवघ्या १२२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने पहिल्या ३५ धावा करण्यासाठी ७३ चेंडू घेतले. पण यानंतर त्याने अवघ्या ४९ चेंडूत पुढील ६५ धावा केल्या. पण यानंतर पाठदुखीच्या समस्येमुळे तो निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. 

१०४ धावांची इनिंग खेळल्यानंतर जैस्वाल २०२४ या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने केन विल्यमसनला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये ४६३ कसोटी धावा केल्या आहेत. तर विल्यमसनने आतापर्यंत ४०३ कसोटी धावा केल्या आहेत.

२०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज

यशस्वी जैस्वाल- ४६३ धावा

केन विल्यमसन- ४०३ धावा

रचिन रवींद्र- ३०१ धावा

रोहित शर्मा- २९५ धावा

डेव्हिड वेडिंगहॅम- २९१ धावा

यशस्वी जैस्वालचे कसोटी करिअर

यशस्वी जैस्वाल केवळ २२ वर्षांचा आहे. त्याने गेल्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी ७ कसोटी सामन्यांमध्ये ७५१ धावा केल्या आहेत. यात ३ शतकांचा समावेश आहे. त्याने भारतासाठी १७ T20I सामन्यांमध्ये ५०२ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्येही दाखवली ताकद

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी करून यशस्वी जैस्वालने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. त्याने आयपीएल २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. आयपीएल २०२३ च्या १४ सामन्यांमध्ये त्याने ६२५ धावा केल्या. तर आयपीएल २०२२ मध्ये तो २५८ धावा करण्यात यशस्वी ठरला होता.

Whats_app_banner