Yashasvi Jaiswal Hundred Equals Sachin Tendulkar Record : यशस्वी जैस्वाल याने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. या शतकासह जैस्वालने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. जैस्वालने अवघड खेळपट्टीवर २०५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.
२०२४ च्या कॅलेंडर वर्षातील जैस्वालचे हे तिसरे कसोटी शतक होते. सध्या जयस्वाल याचे वय २२ वर्षे ३३२ दिवस आहे. तर दिग्गज तेंडुलकरने १९९२ च्या कॅलेंडर वर्षात वयाच्या २३ वर्षापूर्वी ३ शतके झळकावली होती. अशा प्रकारे जैस्वालने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.
या यादीत सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. गावस्कर यांनी १९७१ च्या कॅलेंडर वर्षात ४ शतके झळकावली होती. याशिवाय १९९३ च्या कॅलेंडर वर्षात विनोद कांबळीने ४ शतके झळकावली होती.
४ शतके - सुनील गावस्कर १९७१ मध्ये
४ शतके - विनोद कांबळी १९९३ मध्ये
३ शतके - रवी शास्त्री १९८४न मध्ये
३ शतके - सचिन तेंडुलकर १९९२ मध्ये
३ शतके - यशस्वी जैस्वाल २०२४ मध्ये.
यासह जैस्वाल ऑस्ट्रेलियात पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. १९६७-६८ मध्ये ब्रिस्बेनमध्ये शतक झळकावणाऱ्या मोटागनहल्ली जयसिम्हाने पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९७८ मध्ये सुनील गावस्कर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. गावसकर यांनी ब्रिस्बेनमध्येच शतक झळकावले होते. आता जैस्वालने पर्थमध्ये खेळताना ही आश्चर्यकारक कामगिरी केली.
जैस्वाल वयाच्या २३ वर्षांपूर्वी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. जैस्वालचे हे चौथे शतक होते. या यादीत सचिन तेंडुलकर ८ शतकांसह अव्वल स्थानावर आहे.