भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली आहे. त्याने टॉ हार्टलेच्या गोलंदाजीवर षटकार मारून शतक पूर्ण केले.
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी सलामीला आले. रोहित १४ धावा करून बाद झाला. पण यशस्वीने संयमी खेळी खेळली. हे वृत्त लिहेपर्यंत यशस्वीने १८३ चेंडूंचा सामना करत १२५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. यशस्वीच्या शानदार खेळीमुळे भारताने ६२ षटकांत ३ बाद २२३ धावा केल्या होत्या.
यशस्वीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १७१ धावांची इनिंग खेळली होती. जुलै २०२३ मध्ये झालेल्या सामन्यात यशस्वीने ३८७ चेंडूंचा सामना केला होता. त्याने त्या खेळीत १६ चौकार आणि एक षटकार लगावला होता. यानंतर त्याने दुसऱ्या डावात अर्धशतकही झळकावले.
भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.