मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गांगुलीला जमलं नाही ते यशस्वी जैस्वालनं केलं, कोहली-द्रविडच्या खास क्लबमध्ये केली एन्ट्री

गांगुलीला जमलं नाही ते यशस्वी जैस्वालनं केलं, कोहली-द्रविडच्या खास क्लबमध्ये केली एन्ट्री

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 24, 2024 04:19 PM IST

yashasvi jaiswal 600 plus runs in test series : यशस्वी जैस्वाल कसोटी मालिकेत ६०० धावा करणारा भारताचा पहिला डावखुरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी टीम इंडियाच्या एकाही डावखुऱ्या फलंदाजाला कसोटी मालिकेत ६०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

yashasvi jaiswal
yashasvi jaiswal (AP)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने इतिहास रचला आहे. जैस्वालने एका कसोटी मालिकेत ६०० धावा करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच डावखुरा फलंदाज आहे.

सौरव गांगुली आणि, गौतम गंभीर, युवराज सिंग सारखे दिग्गज फलंदाजदेखील त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत अशी कामगिरी करू शकले नाहीत.

यशस्वीची आणखी एक शानदार खेळी

इंग्लंड विरुद्ध रांची येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालची चांगलीच बोलत आहे. रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह भारतीय डावाची धुरा सांभाळली. यशस्वीने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतरही यशस्वीने आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवत आणखी एक दमदार अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी ११७ चेंडूंत ७३ धावा करून बाद झाला.

रांचीमध्ये यशस्वीने इतिहास रचला

यशस्वी जैस्वाल कसोटी मालिकेत ६०० धावा करणारा भारताचा पहिला डावखुरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी टीम इंडियाच्या एकाही डावखुऱ्या फलंदाजाला कसोटी मालिकेत ६०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. २००७ मध्ये सौरव गांगुलीने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५३४ धावा केल्या होत्या.

कोहली-द्रविडच्या खास क्लबमध्ये जागा मिळाली

एका कसोटी मालिकेत ६०० धावा करणारा यशस्वी जैस्वाल हा भारताचा फक्त तिसरा फलंदाज आहे. यशस्वीच्या आधी फक्त विराट कोहली आणि राहुल द्रविडच हा पराक्रम करू शकले आहेत. या मालिकेत आतापर्यंत यशस्वी जैस्वाल शानदार फॉर्मात असून त्याने द्विशतकही ठोकले आहे.

रोहित-गिलची निराशा

इंग्लंडला पहिल्या डावात ३५३ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली, मात्र ३८ धावा केल्यानंतर तो विकेट फेकून निघून गेला. यानंतर रजत पाटीदारने पुन्हा एकदा निराशा केली आणि तो १७ धावा करून तो स्वस्तात बाद झाला.

IPL_Entry_Point